खेड्यातील वैष्णवी नागपूर विद्यापीठात अव्वल, कॉलेज तर्फे बेस्ट स्टुडेंट अवॉर्ड


गोंदिया, अर्जुनी/ मोरगाव, दिनांक – 13 एप्रिल 2021 – जिद्द ,चिकाटी आणि सातत्य या त्रिसूत्रीचा वापर करून कुठल्याही  गोष्टीवर विजय प्राप्त करता येते. यश प्राप्ती करताना स्थिती, परिस्थिती, काळ वेळ कितीही आडवे आले, तरी मनाच्या एकाग्रतेने विजयश्री खेचून आणता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण तालुक्यातील खांबी पिंपळगाव या छोट्याशा खेड्यामधलि वैष्णवी देवानंद खोटेले ही आहे.

वैष्णवीने एम. एस.सी सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. वैष्णवीने विद्यापीठातून 82.20 टक्के गुण संपादन केले आहे. एम.एस.सी या शाखेत नागपूर विद्यापीठात आजपर्यंतच्या इतिहासात शिवाजी सायन्स महाविद्यालया चा दबदबा राहिला आहे असे सांगतात. वैष्णवीने या विद्यालयाचा विक्रम मोडीत कोराडी येथील तायवाडे महाविद्यालयाला हा बहुमान मिळवून दिला आहे.

वैष्णवी चे पदवीत्तर शिक्षण कोराडी च्या तायवाडे महाविद्यालयात पूर्ण केले. तिने विद्यालयात चारही सेमिस्टरमध्ये प्रथम येण्याचा मान प्राप्त केला आहे. सत्र 2020-21 मध्ये नागपूर विद्यापीठांमधून एमएस्सी सूक्ष्मजीवशास्त्र या अभ्यासक्रमात ती  82.20 टक्के गुण घेऊन विद्यापीठात अव्वल आली. वैष्णवीला महाविद्यालयातर्फे बेस्ट स्टुडंट हा सुद्धा अवार्ड मिळाला आहे.

वैष्णवी चे प्राथमिक शिक्षण स्वगावी खांबी येथिल जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण तिने बोंडगाव देवी येथील मानवता विद्यालयात पूर्ण केले. विद्यापिठाच्या वतीने होणाऱ्या दीक्षांत समारोहात वैष्णवीला सन्मानित करण्यात येणार आहे. वैष्णवी ने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हे यश संपादन केल्याबद्दल तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


 

Leave a Comment