गोंदिया, दि. ११ जानेवारी : गृह विभाग, महाराष्ट्र शासन व संचालक, अभियोग संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, गोंदिया अंतर्गत जिल्ह्यातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयांमध्ये शासनाच्या वतीने कामकाज पाहण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस झालेल्या प्रणिता वसंतराव जोशी, रंजिता राजेंद्रकुमार शुक्ता, आशा तेजराम भाजीपाले व अभिलाष गोविंद येळे यांच्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता (राजपत्रित गट-अ), पदावर नियुक्त्या करण्यात आल्या.
सदर नवनियुक्त सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांचा स्वागत समारंभ मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २.०० वा सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता गोंदिया यांचे कार्यालयामध्ये पार पडला. सदर कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश हे अध्यक्ष म्हणून व पोलीस अधिक्षक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मा. ए. टी. वानेखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश महोदयांनी आपल्या अध्यक्षिय भाषणामध्ये, अभियोक्ता हा फौजदारी न्याय वितरण प्रणाली चा भाग असून त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होऊन न्यायव्यवस्थापित करण्याच्या प्रक्रियेत आपल्या कॅडर ला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असा संदेश दिला.
गोरख भामरे, पोलीस अधिक्षक महोदयांनी न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्यायालय व पोलीस यांच्याबरोबरच अभियोक्ता हा देखील एक महत्वाचा घटक आहे त्यांनी जबाबदारीने कामकाज पहावे, अशा सूचना दिल्या. तर शासनाच्या वतीने कामकाज पाहण्याची सुवर्णसंधी अभियोक्त्यांना मिळत असून त्या संधीचे त्यांनी सोने करावे असे मत सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, गोंदिया सतिशकुमार घोडे यांनी मांडले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी केले.
सदर कार्यक्रमास ए. टी. वानेखेडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश, अध्यक्ष म्हणून तर गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया, हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत तसेच प्रामुख्याने कार्यक्रमास सतिशकुमार घोडे सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता, गोंदिया, महेर, डीवायएसपी गोदिया, द हितवाद वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी अपूर्व मेठी सीएमएस सेल चे अधिकारी व अंमलदार जिल्ह्यातील सर्व सहाय्यक सरकारी अभियोक्ते, तसेच सहाय्यक संचालक व सरकारी अभियोक्ता कार्यालय, गोंदिया येथील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.