रस्ते सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या. – जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक संपन्न.

गोंदिया, दि.11 जानेवारी (जि.मा.का) : मोटार वाहन अपघातास परिणामकारकरित्या आळा बसावा यासाठी नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याची गरज आहे. वाहन चालवितांना वाहतुकीचे नियम पाळणे व रस्ते सुरक्षितता हा सर्वच स्तरावरील प्राधान्याचा विषय आहे. त्यामुळे रस्ते सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दि. 09 जानेवारी रोजी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. सभेला पोलीस अधीक्षक गोरख भामरे, सा.बा. क्र.1 चे कार्यकारी अभियंता नरेश लभाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, न.प.चे मुख्याधिकारी संदिप चिद्रवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर, नॅशनल हायवेचे उपविभागीय अभियंता मिलिंद निंबाळकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांचेसह बेटर स्वयंसेवी संस्थेचे अपुर्व मेठी, दिलीप जैन, तरुण मनोजा, विपलव जयस्वाल, शैलेश अग्रवाल उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी शाळा-महाविद्यालय स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात यावे. अंधारात रस्त्यावर बसलेली जनावरे नागरिकांना दिसत नाहीत, त्यामुळे रस्त्यावर बेवारस असलेल्या सर्व जनावरांना रिफ्लेक्टर पट्टी लावण्यात यावी. यामध्ये कोणताही निष्काळजीपणा होता कामा नये असे सांगून ते पुढे म्हणाले, वाहतूक नियमांचे पालन न करणे, वेगाने वाहन चालविणे, मद्यपान करून वाहन चालविणे व चुकीच्या बाजूने वाहन चालविणे अशा कारणांमुळे रस्ते अपघात मोठ्या प्रमाणात घडत असतात. आपल्या देशात रस्ते अपघातात मृत्यूची संख्या वाढत आहे, याचे एकमेव कारण म्हणजे वाहतूक नियमांचे पालन न करणे हे आहे. दुचाकीच्या अपघाताची सुद्धा हीच कारणे आहेत. वेगापेक्षा मानवाचा जीव महत्वाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. रस्ते सुरक्षाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित यंत्रणांनी पुढील बैठकीत फोटोग्राफसह सादर करावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

गोंदिया जिल्ह्यात नैनपूर (डुग्गीपार पो.स्टे.), मासुलकसा (देवरी पो.स्टे.), मुंडीकोटा (तिरोडा पो.स्टे.), सहकारनगर (तिरोडा पो.स्टे.), गॅस गोडाऊन (सालेकसा पो.स्टे.), भागवतटोला शिवार (रामनगर पो.स्टे.), कटंगीकला शिवार (रामनगर पो.स्टे.), कुनबीटोला/बाराभाटी (अर्जुनी मोरगाव पो.स्टे.) असे एकूण 8 ब्लॅक स्पॉट आहेत. त्यापैकी नैनपूर (डुग्गीपार पो.स्टे.) व मासुलकसा (देवरी पो.स्टे.) हे 2 ब्लॅक स्पॉट दुरुस्त (Rectify) करण्यात आलेली आहेत व उर्वरित 6 ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करणे सुरु आहे. जिल्ह्यात एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या 3 लाख 75 हजार 351 आहे. यामध्ये दुचाकी वाहन- 3 लाख 8 हजार 747, तीनचाकी व चारचाकी वाहन- 28 हजार 791, परिवहन- 36 हजार 768 व इतर 1 हजार 45 वाहनाचा समावेश आहे, अशी माहिती यावेळी बैठकीत देण्यात आली.

 

Leave a Comment

और पढ़ें