काय सांगता! …या गावात चक्क दोन उपसरपंचांची निवड करण्यात आली.


पुणे, वृत्तसेवा, दी. 27 नोव्हेंबर : विद्यमान राज्य सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्री करण्यात आले आहेत. ही कार्यपद्धत वापरत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी गावात चक्क दोन उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या उपसरपंचांच्या निवडीला मान्यता देण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे. त्यावर कायदे, नियम पाहून निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामपंचायत शाखेने स्पष्ट केले आहे. अशी माहिती देत लोकसत्ता वरून 25 नोव्हेंबर रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.



राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्याचा कित्ता गिरवत जारकरवाडी ग्रामपंचायत सदस्यांनी गावात दोन उपसरपंच असावेत, अशी मागणी केली. त्यानुसार जारकरवाडी ग्रामपंचायतीला दोन उपसरपंच नेमण्यात आले आहेत. कौसल्या संतोष भोजने आणि सचिन बापू टाव्हरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असल्याचे गावच्या सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांनी जाहीर केले.

‘ग्रामपंचायत जारकरवाडीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीबाबत ग्रामपंचायत अधिनियम १९५१५ कलम २८(१) प्रमाणे नियम १९८४ मधील तरतुदी नुसार सरपंच प्रतीक्षा कल्पेश बढेकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक २३ नोव्हेंबरला घेण्यात आली. मी अनुसूचित जमाती प्रवर्गातून सरपंचपदी असल्याने आणि आमच्या गावच्या लोकसंख्येचा, विस्ताराचा विचार करता ग्रामपंचायत जारकरवाडीसाठी दोन उपसरपंचांची नेमणूक करण्याची सर्व परिस्थिती पाहता गरज वाटत आहे.

राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कार्यभार स्वीकारतात, त्याप्रमाणे मी माझ्या जारकरवाडी गावात माझ्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्याच्या विचाराने कौसल्या संतोष भोजने यांची उपसरपंचपदी नियमानुसार निवड झाली आहे, त्याच वेळीस सचिन बापू टाव्हरे यांची उपसरपंच ग्रामपंचायत अधिनियम कलम २८(१) प्रमाणे नियम १९६५ मधील तरतुदीनुसार उपसरपंच म्हणून सर्व सदस्यांच्या मताने स्वाक्षरीनिशी माझ्या अध्यक्षतेखाली निवड करत आहे. या निवडीने जसे राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत. त्याच प्रमाणे जारकरवाडीला देखील दोन उपसरपंचाची निवड करत आहे,’ असे बढेकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

दरम्यान, दुसऱ्या उपसरपंच यांच्या निवडीला मान्यता देण्याची मागणी जारकरवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडे केली आहे. कायदे, नियम पाहून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले. असेही वृतात नमूद आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें