मुंबई, वृत्तसेवा, दि. 17 ऑगस्ट : खबरदार! माझा फोटो वापराल तर… कोर्टात खेचेन, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी झालेल्या एका पत्रपरिषदेद्वारे दिला.
आज 17 ऑगस्ट रोजी लोकमत डिजिटल ने दिलेल्या माहिती नुसार छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेल्या पवार यांनी मी ‘इंडिया’तच असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, गुरुवारी बीड येथे होणाऱ्या सभेच्या निमित्तानेही ‘साहेब, आम्हाला आशीर्वाद द्या’ असा मजकूर असलेले फलक बीडमध्ये झळकत आहेत.
मी ‘इंडिया’ तच आहे, याची ग्वाही देत पवार यांनी ‘पंतप्रधानांना मणिपूरपेक्षा पुन्हा सत्तेत येण्याचीच चिंता अधिक दिसते’ असा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श घेत पंतप्रधान मोदी यांनी ‘पुन्हा येईन’ची घोषणा केली. फडणवीस पुन्हा सत्तेत आले; पण उपमुख्यमंत्री होऊन. मोदींना काय व्हायचं आहे माहीत नाही? आम्ही भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही.
जे आमच्यातून गेले त्यांच्याशीही आमचा संबंध नाही, असे त्यांनी जाहीर केले. अजित पवार यांच्याशी झालेल्या गुप्त भेटीतला तपशील देण्याचे टाळत शरद पवार यांनी, कुटुंबात मी वरिष्ठ असल्याने कुणी माझ्याकडून सल्ला घेत असेल, त्यात चुकीचं काय, असा प्रतिप्रश्न केला.