सडक अर्जुनी, दि. 11 नोव्हेंबर : अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील प्रहार संघटनेचे उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापूरे यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी या दोन ठिकाणी प्रचार सभा घेत खा. प्रफुल पटेलांचा समाचार घेतल या मतदार संघातून प्रहार संघटनेचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
तर या मतदार संघांचे प्रतिनिधित्व करीत असलेले आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची राष्ट्रवादी अजित पवार गटाने तिकीट कापली तर भाजपच्या उमेदवाराला तिकीट देत आमचा विश्वास घात खा. प्रफुल पटेलांनी केला असे डॉ. सुगत चंद्रिकापुरे म्हणाले.
तर या प्रचार सभेला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील हजारो लोकांनी उपस्थिती लावत डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांना निवडून देऊ असा विश्वास माजी मंत्री बच्चू कडू यांना दिला आहे.
या प्रसंगी व्यासपीठावर आमदार मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ. सुगत चंद्रिकापुरे, किरण कोरे, प्रहार चे जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, तिरोडा येथील पंचायत समिती चे सदस्य वनिता भांडारकर, वसंत गहाणे, सरपंच माधव तरोणे, गोंडवाना गोंड तंत्र संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्ष छायाताई टेकाम, वनिता भांडारकर, मंगेश देशमुख, राष्ट्रपाल तेलतुंबडे, दुलाराम चंद्रिकापुरे, प्रतिभा कुंभरे, मंजुषा चंद्रिकापुरे, दिव्या चंद्रिकापुरे, शशिकला टेंभुर्णी, रघुनाथ चुटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा पैसा का कुणाच्या बापाचा नाही : माजी मंत्री बच्चू कडू
भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी हे काँग्रेसच्या सभेमध्ये दिसत असतील तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला सांगा आम्ही त्यांच्या करेक्ट कार्यक्रम करू असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर सडक अर्जुनी येथील सभेत बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू म्हणाले की हा पैसा का कुणाच्या बापाचा नाही.
सर्वसामान्य नागरिक जे टॅक्स भरतात त्याचा हा पैसा आहे. त्यांच्या बापाचा हा पैसा नाही. आणि मागितली कोणी होती लाडकी बहीण योजना आम्ही दुधाला भाव मागितला. आम्ही धान पिकाला भाव मागितला होता. पण ते सरकारला जमलं नाही. आणि मतासाठी लाडकी बहीण योजना सुरू करता ही लाडकी बहीण तुम्हाला आता सबक दिल्याशिवाय राहणार नाही. अशी खणखणीत टीका त्यांनी धनंजय महाडिक यांच्यासह राज्य सरकारवर केली.
दरम्यान, खा. प्रफुल पटेल यांनी अर्जुनी मोरगाव चे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांना उद्देशून या भागातल्या ठेकेदारांचे पैसे राज्य सरकार थांबवेल या वक्तव्याच्या समाचार घेताना बच्चू कडू म्हणाले की प्रफुल पटेल सारखा माणूस धमक्या देत असेल तर आम्ही आंडूपांडू नाही. पुन्हा धमकी दिली तर आम्ही त्यांच्या घरावर जाऊ, प्रफुल पटेल यांनी समजून घ्यावं त्यांनी अवकातीत राहावं तर आम्ही अवकातीत राहू.
त्यांनी अवकात सोडली तर आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत. असे टीकास्त्र त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर सोडले. प्रफुल पटेल एक गेल्या काही दिवसापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसले आहेत, ते असेच विकासासाठी ठाण मांडून बसले असते तर एवढी गरज पडली नसती. तुम्ही केंद्रीय मंत्री होते. तुमच्याजवळ अलटून-पाटून तुमच्याकडे सत्ता आली. सत्तेशिवाय तुम्ही राहू शकत नाही पण विकासाचा डोंगर तुम्हाला उभारता आला नाही. अशी बोचरी टीकाही त्यांनी प्रफुल पटेल यांच्यावर केली.
माजी मंत्री बच्चू कडू सडक अर्जुनी येथील पंचायत समिती जवळील मैदानात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे ते म्हणाले सरकार शेतकऱ्यांना धानासाठी जे दर ठरवून देते त्यामध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक होत असून शेतकऱ्यांनी जागे होण्याची गरज असल्याचे ते बोलले ही प्रचार सभा सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथे आयोजित करण्यात आली होती या नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.