गोंदिया, दि. 26 ऑगस्ट 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून संभाव्य उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सध्या राज्यात महाविकास आघाडी व महायुती असे २ गट असले तरी त्या अंतर्गत असणारे मित्रपक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच महाविकास आघाडी अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रावर दावा केला असून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट लढणार असल्याचे बोलून दाखविले. ते २६ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असतांना सडक अर्जुनी येथे वॉर रूमच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
सविस्तर असे की, अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व आहे. यापूर्वी या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार निवडून आले होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर मतदारांनी निवडून दिलेले आमदार अजित पवार गटात गेले. लोकप्रतिनिधी कोणत्याही गटात गेले असले तरी या भागातील मतदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीवर व कार्य प्रणालीवर नितांत श्रद्धा व विश्वास आहे.
विद्यमान जनप्रतिनिधी दुसऱ्या गटात गेल्यावरही या भागातील नागरिकांनी शरदचंद्र पवार यांच्या विचारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या भागात तेवत ठेवली, आजही या भागात मोठ्या प्रमाणात शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणारे मतदार असल्याने येत्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट लढणार असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
तथापि, २६ ऑगस्ट रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर असतांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महेश (मिथुन) मनोजकुमार मेश्राम यांच्या माहितीपत्रकाचे विमोचन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सडक अर्जुनी येथे वॉर रूमचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागाव्या अशा सूचना पदाधिकारी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.