( संग्रहित छायाचित्र )
मुंबई वृत्तसेवा, दि. 25 ऑगस्ट : राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत होत आहे. बदलापुरची घटना ताजी असतानाच आता नालासोपारा मधील संतापजनक प्रकार समोर आला आहे. नवराष्ट्र डिजिटल ने दिलेल्या माहितीनुसार नालासोपार्यात १७ वर्षीय मुलीवर दोन जणांनी सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी 17 वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्या तरुणाची तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती.
गुरुवारी 25 वर्षीय सोनू नामक तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर पीडीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.
पिडीत मुलीच्या पालकांनी पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलीची केवळ 4-5 दिवसांची ओळख होती. तिला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.
बदलापूरमधील एका नामांकित आणि सर्वात मोठ्या शाळेत साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे याबाबतची तक्रार देण्यासाठी या मुलींचे कुटुंबीय बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गेले होते. पण त्यांचा गुन्हा सुरूवातीला दाखल करून घेण्यात आला नाही. तब्बल 12 तासानंतर गुन्हा दाखल केला गेला. या घटनेनंतर बदलापुरात संताप व्यक्त केला जातोय. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.