बदलापुर घटनेचा राकॉ शरद पवार गटाकडुन निषेध!

  • नको आम्हाला १५००, आम्हाला हवी महिला व मुलींची सुरक्षितता.
  • नैतिक जबाबदारी म्हणुन गृहमंञ्यांनी द्यावा राजीनामा.

गोंदिया, दि. 22 ऑगस्ट : नुकताच महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत रक्षाबंधनापूर्वीच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये वळते करण्यात आले. याचा शासनाने मोठ्या प्रमाणात गवगवा देखील केला मात्र ही घटना लोटून काही दिवस लोटत नाही तोच राज्यातील एका शाळेतील २ चिमुकल्या बालिकेंवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्याने गोंदिया जिल्ह्यातील महिलांनी नको आम्हाला १५०० रुपये आम्हाला हवी महिला व मुलींची सुरक्षितता असे म्हणत बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करीत या घटनेची जबाबदारी म्हणून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन २१ ऑगस्ट रोजी गोंदिया येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहे.

प्राप्त निवेदनानुसार, नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात लागू करून महिलांकडून अर्ज मागविण्यात आले. महिलांनी मोठ्या प्रमाणात या योजनेसाठी अर्ज केल्याने पात्र महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनापूर्वी १५०० रुपये शासनाकडून पाठविण्यात आले. शासनाकडून महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये पाठविल्यानंतर आम्ही महिलांसाठी कसे चांगले आहोत याचा कांगावा शासनाकडुन केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील ३ वर्षांच्या २ बालिकेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. एकीकडे शासनाच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव हा नारा दिला जात असतांनाच अल्पवयीन बालिकांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबविण्यासाठी शासन कमकुवत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे.

रक्षाबंधनापूर्वी माझी लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यात १५०० रुपये पाठवुन कांगावा करणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी समजून राजीनामा द्यावा अशी मागणी करीत बदलापूर येथील घटनेचा जाहीर निषेध केला. राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसतील तर शासनाकडून दिली जाणारी योजना कोणत्या कामाची असा थेट आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बदलापूर येथील घटनेतील आरोपींना तात्काळ फासावर लटकवा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.  

या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम, महिला जिल्हाध्यक्ष मंजू डोंगरवार, रोशनी सारंगपुरे, रूपा गिऱ्हेपुंजे, तालुकाध्यक्ष दिनेश कोरे, युवक जिल्हाध्यक्ष आशिष येरणे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष देवानंद तागडे, सडक अर्जुनी शहर प्रमुख दिलीप गभने, सुरेश खोब्रागडे, खुशाल डोंगरवार, घनश्याम कापगते, दुर्गेश खोटेले, राहुल बोलके, यासह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें