गोंदिया, दि. ०८ मे २०२४ : महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव आय.ए. कुंदन यांना माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी ०७ मे रोजी निवेदन देऊन गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे समायोजन करण्यास स्थगिती देऊन या शाळा पुर्ववत सुरू ठेवण्यात यावे ही विनंती केली.
विशेष म्हणजे दि.१२/४/२०२४ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया यांनी पत्र काढुन २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा नजीकच्या मोठ्या शाळेत समायोजन करण्याबाबत मुख्याध्यापकांना पत्र दिले. यात जिल्ह्यातील ८५ शाळा समाविष्ट आहेत.
या शाळा अतिशय दुर्गम भागातील व बहुतांश आदिवासी ग्रामीण भागातील असल्याने सदर शाळा बंद झाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास होईल. त्यांना बाहेर जाण्याचा त्रास होऊन परीणामी त्यांचे शिक्षणात खोळंबा होईल याची जाणीव ठेवून सदर शाळा पुर्ववत सुरू ठेवण्यात यावे याबाबत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी प्रधान सचिव यांना ही बाब लक्षात आणून दिली. सचिव कुंदन यांनी याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.