गोंदिया, दी. 30 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाच्या वतीने शासन आपल्या दारी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येत आहे. याच धरतीवर गोंदिया जिल्हा परिषदेने अभिनव उपक्रम राबविला असून जिल्हा परिषद आपल्या गावी या उपक्रमाला आज दी. 30 नोव्हेंबर पासून गोंदिया जिल्ह्यातील ग्राम डव्वा येथून सुरुवात करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध योजना ह्या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्या व त्याचा लाभ नागरिकांना व्हावा या हेतूने जिल्हा परिषद आपल्या गावी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील एकूण 104 गावांमध्ये हा उपक्रम पार पाडण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यातीच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डव्वा या गावातून आज या उपक्रमाला सुरुवात झाली असून याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपाध्यक्ष यशवंत गणवीर व जिल्हा परिषदेचे सदस्य व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.