…तर कोण होणार राज्याचा नवा मुख्यमंत्री ?


मुंबई वृत्तसेवा, दी. 21 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्याला वेग दिला आहे. या कारवाईत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागल्यास त्यांच्या जागी अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील व नितीन गडकरी यांची नियुक्ती करण्याच्या मुद्यावर भाजपमध्ये मोठा खल सुरू असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. अशी माहिती माय मराठी या वेसाइटवरून आज प्रकाशित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्यात विलंब केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कोर्टाने त्यांना एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच लागण्याची शक्यता आहे.

पक्षांतर्गत बंदी कायदा व संविधानातील 10 व्या परिशिष्टानुसार एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे – फडणवीस सरकारला मोठा धक्का बसू शकतो. असे झाले तर राज्यात अस्थिरता निर्माण होऊ नये यासाठी भाजपच्या गोटात यासंबंधीची रणनीती आखली जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंवर अपात्रतेची कारवाई झाली तर भाजप विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री म्हणून पुढे करेल. एवढेच नाही तर भाजपमध्ये या पदासाठी देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही नावे चर्चेत आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर यासंबंधीचे पत्ते उघड केले जाणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी आमदार अपात्र ठरल्यास भाजप त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करणार? असा प्रश्नही या प्रकरणी विचारला जात आहे. तसेच अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चाही या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत महिन्यात मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील असे नमूद करत यासंबंधीच्या चर्चेला पूर्णविराम दिला होता. पण आता शिंदे अपात्र झाल्याच्या स्थितीत फडणवीस कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असेही सूत्रांनी म्हटले आहे. असे माय मराठी ने आपल्या वृतातून प्रकाशित केले आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें