- पात्र लाभार्थी कुटूंबांकडून अर्ज आमंत्रित, ही आहे शेवटची तारीख…
गोंदिया, दि. 17 सप्टेंबर : राज्यात ग्रामीण भागात वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील पात्र कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाने ‘मोदी आवास’ घरकुल योजना राबविण्यास मान्यता दिलेली आहे. आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतू Automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी यांचा यात समावेश आहे.
सदर योजने अंतर्गत पुढील तीन वर्षात इतर मागास प्रवर्गातील 10 लाख पात्र लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. वरील समाविष्ठ असलेल्या इतर मागास प्रवर्गातील पात्र कुटूंबांना नविन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात येईल.
या योजनेअंतर्गत वरीलप्रमाणे उपलब्ध यादीमधून प्राधान्य क्रमानुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थ्यांची निवड करावयाची आहे. ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी यांचेमार्फत करण्यात येईल व तद्नंतर मान्यतेसाठी जिल्हा स्तरावर पाठविण्यात येईल.
लाभार्थी पात्रतेचे निकष : लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपये पेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याचे स्वत:च्या अथवा कुटूंबियांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्यांचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कोठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण/ गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन:श्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र असणार नाही. लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ठ नसावा.
प्राधान्यक्रम : लाभार्थी यादी पात्र करतांना ग्रामसभेने विचारात घ्यावयाचे प्राधान्यक्षेत्र पुढीलप्रमाणे असतील. घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा/ परितक्त्या महिला, कुटूंब प्रमुख. पूरग्रस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी. जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान (आग व इतर तोडफोड) झालेली व्यक्ती.
नैसर्गिक आपत्ती बाधित व्यक्ती. दिव्यांग व्यक्ती : उद्दिष्टांच्या किमान 5 टक्के उद्दिष्ट दिव्यांगांकरीता राखीव ठेवणे आवश्यक. इतर पात्र कुटूंबे. आवश्यक कागदपत्रे : 7/12 उतारा/ मालमत्ता नोंदपत्र/ ग्रामपंचायतमधील मालमत्ता नोंदवहीतील उतारा अथवा ग्रामपंचायत प्रमाणपत्र. सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची छायाप्रत, कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख 20 हजार रुपचे पेक्षा कमी असल्याचे सक्षम अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र/ विद्युत बील/ मनरेगा जॉब कार्ड, लाभार्थ्याच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याच्या पासबुकची छायांकीत प्रत.
वरील घरकुल योजनेकरीता प्राधान्य क्रमानुसार ग्रामसभेमार्फत लाभार्थ्यांची निवड करुन पात्र कुटूंबांचे प्रस्ताव संबंधीत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचेमार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागे, पतंगा मैदान, गोंदिया येथे 29 सप्टेंबर 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.
