मुंबई, वृतसेवा, दिनांक ; ३० जून २०२२ ; शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांनाही आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यात केंद्रीय मंत्री भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी राजभवन सभागृहाच्या मंचावर आले तेव्हा शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला. यावेळी शिंदे समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. स्वतः एकनाथ शिंदे यांना शपथ घेताना समर्थकांना शांत बसण्यास सांगावं लागलं.
भापजा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याच्या नवे मुख्यमंत्री असतील, भाजपा पक्षाचा या सरकारला पाठिंबा असेल, अशी घोषणा घोषणा केली होती. तसेच ही घोषणा करताना मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझ्यावर जबाबदारी असेन, असेही फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर भाजपच्या दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले.
भाजपा अध्यक्ष श्री @JPNadda जी के कहने पर श्री @Dev_Fadnavis जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है।
यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उन्होंने हृदय से बधाई देता हूँ।
— Amit Shah (Modi Ka Parivar) (@AmitShah) June 30, 2022
अमित शाह काय म्हणाले?
अमित शाह म्हणाले, “भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन केलं. तसेच महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रती त्यांची खरी निष्ठा आणि सेवाभाव दाखवतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”
भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांनी देखील नव्या राज्य सरकारचा भाग बनावं असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं असं केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं आहे. मी देखील त्यांना व्यक्तिगत विनंती केली आहे.”