- संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे
मुंबई, वृतसेवा, दी. ०६ फेब्रुवारी : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज प्रसिद्ध शिव व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे. दी. ०५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या निधनामुळे तीर्थक्षेत्र देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, घटनास्थळी देहूरोड पोलीस दाखल झाले असून तपास सुरू आहे, त्यांच्या पश्चात आई- वडील असा परिवार आहे.
- आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलले, मिळाले सुसाईड नोट
मीडिया सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार देहूमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज शिरीष महाराज मोरे हे काल रात्री जेवण केल्यानंतर झोपण्यासाठी गेले. त्यानंतर त्यांनी सकाळी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे त्यांच्या खोलीचे दार तोडले असता त्यांनी उपरण्याच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे समोर आले. आत्महत्येपूर्वी शिरीष महाराज यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यानुसार आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
शिरीष मोरे यांचा 20 दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. येत्या एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. हभप शिरीष महाराज हे प्रसिद्ध प्रवचन आणि किर्तनकार त्याचप्रमाणे शिवव्याख्याते देखील होते. या घटनेने मोरे कुटुंबियांसह संपूर्ण देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र या दुःखातून सावरण्यासाठी मोरे कुटुंबियांना वेळ द्यावा, असे आवाहन मोरे कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.
- छगन भुजबळ यांनी वाहिली श्रद्धांजली
शिरीष मोरे यांच्या निधनानंतर आमदार छगन भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि प्रसिद्ध शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांच्या अकस्मात निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! शिवव्याख्याते म्हणून नावलौकिक असलेल्या शिरीष महाराजांचं हे निधन ही वारकरी संप्रदायाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी व माझा संपूर्ण परिवार सहभागी आहे. त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, तसेच स्व. शिरीष महाराज मोरे यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच प्रार्थना!”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
![Maharashtra Kesari News](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/05/cropped-Picsart_23-12-16_14-59-10-524-150x150.png)