- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा ‘एल्गार’
गोंदिया, दि. : 01 ऑक्टोंबर : राज्यभरात शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू असून, अशैक्षणिक आणि ऑनलाईन कामे, शाळा खाजगीकरणाचे आणि शाळा बंद करण्याचे धोरण याबद्दल संताप व्यक्त होत आहे. या विषयावरून आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने, शिक्षकांना शिकवू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या हे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने 02 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा आयोजित केला असल्याची माहिती शिक्षक संघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी दिली आहे.
शिक्षण हक्क अधिनियमानुसार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असताना खाजगीकरणास पूरक धोरणे आणली आहेत. तर गुरुजी माहित्या व उपक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांच्या शाळा धोक्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्यापासून राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा परिषद, अशा वेगवेगळ्या स्तरावरून आतापर्यंत शंभर प्रकारची माहिती शालार्थ, स्टुडन्ट पोर्टल, स्कूल पोर्टल, बदली पोर्टल, प्रशिक्षणाच्या लिंक अशा रोज माहिती मागविल्या जात आहेत. सरकारी शाळा बंद करणे, सरकारी शाळांचे खाजगीकरण करन्यासाठी शिक्षकांना असैक्षणिक कामात व्यस्त ठेवून शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता धासळवून जि प शाळांना बदनाम करण्याचा कट रचल्या जात आहे. शिक्षण विभाग याबाबत चर्चेस तयार नसल्याने 02 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया समोर आक्रोश महामोर्चा चे आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाच्या वतीने केले आहे.
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था डायट यांच्याकडून मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप सुरू असून ते बंद करावे, वर्षानुवर्षे रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती, शिक्षक भरती पूर्ण करावी अशा शिक्षक संघाचे अनेक मागण्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शिक्षकांना मागील चार वर्षापासून चटोपाध्याय व निवडश्रेणी चे आदेश मिळालेले नाही. न्यायालयीन प्रकरणे निकाली लागून सुद्धा प्रशासन त्यावर तात्काळ कार्यवाही करत नाही.
शासनाने शिक्षकांना कोणत्याही प्रकारची रहिवासाची सुविधा उपलब्ध करून दिली नसतानासुद्धा जि प प्रशासनाकडून मुख्यालयी राहण्याची जाचक अट फक्त शिक्षकांवरच लादली जात आहे. जि.प. प्रशासनाला वारंवार विनंती करून सुद्धा या बाबीकडे दुर्लक्ष करून शिक्षण विभागाकडून घरभाडे भत्ता कपाती संबंधाने वेगवेगळी पत्रे निर्गमित केली जात आहेत.
या सर्व मागण्यांकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी 2 ऑक्टोंबर रोजी आयोजित महाआक्रोश मोर्चात सहभागी व्हावे. 5 सप्टेंबर शिक्षक दिनी काळ्याफिती लावूनही शासनाने शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिक्षक संघाचे राष्ट्रीय संघटक नूतन बांगरे विभागीय अध्यक्ष केदार गोटेफोडे, राज्य उपाध्यक्ष आयुब खान वाय.एस. भगत, राज्य कार्यकारिणी सदस्य उमाशंकर पारधी, अनिरुद्ध मेश्राम, जिल्हा सरचिटणीस अरविंद उके, जिल्हा कार्याध्यक्ष हेमंत पटले तथा समस्त जिल्हा कार्यकारीनी तसेच सर्व तालुका अध्यक्ष व सरचिटणीस तथा तालुका संघ कार्यकारिणी प्रचार आणि प्रसार करीत आहेत.
वीस पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून समुह शाळा सुरू करणे म्हणजेच गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे. शिक्षकांना बी एल ओ तथा सर्वेक्षनासारख्या अनेक कामात गुंतवून शिक्षणाचा खेळ खंडोबा केला जात आहे, यामुळे शाळा व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास होत नसल्यामुळे शिक्षकांना शिकवू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या. यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना तसेच समस्त शिक्षक बंधू भगिनींनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाच्या वतीने आयोजित आक्रोश महामोरच्यामध्ये सहभागी व्हावे. नवीन प्रशासकीय इमारत ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरीपण स्वतःच्या हक्काच्या लढाईसाठी सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी केले आहे.