सडक अर्जुनी, दि. 27 ऑगस्ट : तालुक्यातील सौंदड ते चारगांव परसोडी हा मार्ग भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा मार्ग आहे. या मार्गावर पुलाचे बांधकाम नुकतेच काही दिवसा पूर्वी करण्यात आले. कंत्राटदाराने सदर पुलाचे बांधकाम निकृष्ट केल्याचे २५ जुलै ला वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाली होती.
ती बातमी आज खरी ठरल्याचे या फोटोवरून दिसते. या पुलावरून वाहतूक सुरू झाली असून मागिल १५ ते २० दिवसांपासून वाहतूक सुरू आहे. या मार्गावरून अनेक ट्रॅक्टर, चारचाकी वाहन, ट्रक, फसले आहेत. कारण पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने रोडावर गिट्टी व बोल्डर न टाकता रोडाचे दोन्ही कडेला माती मुरुम टाकून रोड तयार केला.
त्या कारणाने ट्रॅक्टर, ट्रक फसत आहेत. सदर पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्याने कंत्राटदार व अधिकारी यांचे पितळ उघडकीस आले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या मार्गाने मार्गक्रमण करतांना परसोडी, सुंदरी, चारगांव येथील विद्यार्थी व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पुलाचे बांधकाम निकृष्ट करण्यात आले असून या कामाची संबंधीत विभागाने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरीक व विद्यार्थी यांनी केली आहे.