- जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याची झाली होती सेटिग
नागपूर, वृतसेवा, दी. ०६ फेब्रुवारी : कोराडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. जमीन प्रकरणात गुन्हा दाखल न करण्याच्या सेटिंगच्या बदल्यात आरोपी सहायक पोलीस निरीक्षकाने पैसे मागितले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. प्रेमानंद दादाराव कात्रे (४३) असे आरोपी सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. एका व्यक्तीविरोधात मौजा कवठा, कामठी येथील संयुक्त मालकीच्या शेतीच्या विक्रीपत्राच्या व्यवहारात फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेकडून आली होती.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची भिती कात्रेने दाखविली होती. जर गुन्हा दाखल करायचा नसेल व प्रकरण दाबायचे असेल तर दोन लाख रुपये लागतील असे कात्रेने संबंधित व्यक्तीला म्हटले होते.
कात्रेला पैसे देण्याची इच्छा नसल्याने संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणाची प्राथमिक शहानिशा करून एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बुधवार ०५ फेब्रुवारी दुपारच्या सुमारास कोराडी पोलीस ठाण्यात आरोपीने संबंधित व्यक्तीकडून दोन लाखांची लाच स्वीकारली असता एसीबीच्या पथकाने कात्रेला रंगेहाथ पकडले. पोलिसांनी रकमेची शहानिशा केली. कात्रेविरोधात कोराडी पोलीस ठाण्यातच भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रिती शेंडे, निलेश उरकुडे, भरत ठाकूर, भागवत वानखेडे, हेमराज गांजरे, दिपाली भगत, विजय सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तक्रार मागे घेण्यास लावण्याचे दिले होते आश्वासन
एसीबीकडे तक्रार करणाऱ्या व्यक्तीला जाळ्यात ओढण्यासाठी कात्रेने सेटिंग करून देण्याचे आश्वासन दिले. जमीन प्रकरणात तक्रार करणाऱ्या महिलेची समजूत काढून दिला तक्रार मागे घेण्यास लावेन असे कात्रेने संबंधित व्यक्तीला सांगितले होते. संबंधिताने अगोदर पैसे देण्यास नकार दिला होता व गावातीलच सरपंचांच्या मदतीने प्रकरण सोडविण्याची भाषा केली होती. मात्र तत्काळ अटक करण्याची धमकी कात्रेने दिल्याने संबंधित व्यक्तीने एसीबीकडे धाव घेतली.