- जिल्ह्यात २० लाख ८९ हजार क्विंटल धान खरेदी, शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी.
गोंदिया, दि. 03 जानेवारी : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या ६० हजारांवर शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपयांचे चुकारे गेल्या महिनाभरापासून थकले आहेत. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून, रब्बी हंगाम आणि इतर कामांसाठी उधार उसनवारी करून गरज भागविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांकडून जिल्ह्यात हमीभावाने धान खरेदी केली जाते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने आतापर्यंत २० लाख ८९ हजार २५१ क्विंटल धानाची ६६,०३५ शेतकऱ्यांकडून धान खरेदी केली आहे. खरेदी केलेल्या एकूण धानाची किमत ४८० कोटी ५२ लाख रुपये आहे.
यापैकी आतापर्यंत शेतकऱ्यांना ८० कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना दिले आहेत. मात्र, सुरुवातीला पोर्टलअभावी महिनाभर चुकारे थकले होते. पोर्टल सुरळीत झाल्यानंतर प्राप्त झालेल्या निधीतून ८० कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आले. मात्र, यानंतर शासना कडून चुकाऱ्यांसाठी निधी प्राप्त झाला नसल्याने जवळपास ६० हजार शेतकऱ्यांचे ४०० कोटी रुपयांचे चुकारे गेल्या महिनाभरापासून थकले आहेत.