- ७७ वर्षांत प्रथमच अहेरी-गर्देवाडा बस सुरु, लॉईडच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, ६२०० कोटींची गुंतवणूक, ९००० रोजगार, कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे १००० कोटींचे शेअर्स प्रदान, गडचिरोलीपासून २०० कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद, सी-६० जवानांचाही केला सत्कार
गडचिरोली, ०१ जानेवारी २०२५ : नवीन वर्षाचा आज पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह ११ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७७ वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून ६२०० कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होते आहे.
आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जात एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.
त्यानंतर दुपारी कोनसरी येथे, लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (४०० कोटी रुपये गुंतवणूक, ७०० रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (३००० कोटी रुपये गुंतवणूक, १००० रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (२७०० कोटी रुपये गुंतवणूक, १५०० रोजगार), वन्या गारमेंट युनिट (२० कोटी रुपये गुंतवणूक, ६०० रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. सुमारे १२०० विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे १००० कोटींचे शेअर्स प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे शेअर्स मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधनबचत होणार, कार्बन उर्त्सजन कमी होणार, रस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून, त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे, अशीही माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
११ जहाल नक्षलींचे समर्पण
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत. यात दोन दाम्पत्य आहेत. या ११ जणांवर महाराष्ट्रात १ कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. ३४ वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. ३ डिव्हिजन किमिटी मेंबर तर १ उपकमांडर, २ एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात ५ नक्षली ठार झाले. २०२४ या वर्षांत २४ नक्षली ठार झाले आणि १८ माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या ६ महिन्यात १६ जहाल नक्षलवादी आणि आज ११ असे २७ जण मुख्य प्रवाहात आले आहेत.
उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या ४ वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. ११ गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-६० च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अतिशय मोलाची मदत या अभियानात मिळते आहे. आता माओवादाविरोधात लढाईत राज्यांच्या सीमा उरलेल्या नाहीत. महाराष्ट्राने सुद्धा सीमेबाहेर जाऊन कारवाया केल्या आहेत. शरणागती पत्करलेल्या नक्षल्यांचे संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.