- 20 टक्के कमिशन च्या नादात, पोलिस उपनिरीक्षकाला बेड्या.
चंद्रपूर, वृत्तसेवा, दि. 14 जानेवारी : बल्लारपूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा याच्याविरूद्ध 50 हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ही कारवाई सोमवारी ( दि. 13 जानेवारी रोजी ) केली आहे. तक्रारदार हे चंद्रपूर येथील असून त्यांचे लाकूड, बांबू, पत्ता इत्यादी मालावर कमिशन आकारून एका जागेवरून दुसन्या जागेवर ट्रकने माल पोहोचविण्याचे काम आहे.
ऑगस्ट महिन्यात तक्रारदार यांनी 19 लाख 2 हजार रूपयांचा तेंदूपत्याचा माल गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथे पोहचविलेला होता. मालाची रक्कम व्यापाऱ्यांकडून येणे बाकी होती. तीन -चार महिन्यांपासून संबंधित व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने तक्रारदाराने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे लेखी तक्रार दिली. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक हुसेन शहा यांनी व्यापाऱ्यांकडून 19 लाख 2 हजार रुपये वसूल करून देण्यासाठी एकूण रकमेच्या 20 टक्के रक्कम ( अंदाजे 3 लाख 80 हजार ) रुपये लाचेची मागणी केली आहे. तथापि नंतर व्यापारी व तक्रारदार यांच्यामध्ये समझोता होऊन प्रकरण आपसात मिटले. तक्रारदाराने व्यापा-यांविरुद्ध दिलेला लेखी तक्रार मागे घेत असल्याबाबत हुसेन शहा यांना सांगितले असता शहा तक्रारदाराला वारंवार फोन करून पैशांची मागणी करू लागले, तसेच वरिष्ठांकडून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवू लागले.
अखेर मानसिक त्रासाला वैतागून तक्रारदाराने 8 जानेवारी रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली आहे. हुसेन शहा याने तक्रारदारासोबत तडजोड करून 50 हजार रुपये घेण्याचे मान्य केले. त्यावरून सापळा रचला गेला. वृत्तपत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शहाने घटनास्थळावरून पळ काढला. हुसेन शहा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, सफौ रमेश दुपारे, पो.हवा. हिवराज नेवारे, पो.हवा. अरूण हटवार, नरेशकुमार नन्नावरे, वैभव गाडगे, अमोल सिडाम, प्रदिप ताडाम, राकेश जांभुळकर, म.पो.शि. मेधा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, चापोशि सतिश सिडाम तसेच संदीप कौरोसे, मो.प.वि. चंद्रपूर यांच्या पथकाने केली आहे.
