मुंबई वृत्तसेवा, दी. 19 डिसेंबर : गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरीबोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी दुपारी जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत प्रवासी बोट समुद्रात बुडून १३ जणांचा मृत्यू, तर ९९ प्रवाशांना वाचविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.
आज लोकमत ने प्रकाशित करून दिलेल्या माहिती नुसार नौदलाच्या प्रवक्त्यानेही दुर्घटनेची माहिती दिली. इंजिनाची चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारी ४ च्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली. या दुर्घटनेत १ नौदल कर्मचारी, नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला, तर ९९ जणांना वाचवण्यात यश आले, असे नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
बोटीत शंभराहून अधिक प्रवासी आणि कर्मचारी होते. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि प्रवाशांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला.
अपघाताची माहिती मिळताच नौदलाच्या ११ बोटी, तटरक्षक दलाची एक बोट, सागरी पोलिसांच्या तीन बोटी, चार हेलिकॉप्टर्स आणि मासेमारी बोटींच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. जखमींना नौदलाच्या अश्विनी हॉस्पिटलसह नेव्हल डॉकयार्ड रुग्णालय, मुंबई महानगरपालिकेचे सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जेएनपीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत
नीलकमल या प्रवासी बोटीच्या अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल. तसेच, या घटनेची नोंदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नीलकमल ही फेरी वाहतूक करणारी बोट निघाली. वाटेत नौदलाच्या बोटीने तिला जोरदार धडक दिली. अतिवेगात गस्त घालणाऱ्या या बोटीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. त्यामुळे नीलकमल बोट पाण्यात बुडाली, असा आरोप बोटीचे मालक राजेंद्र पडते यांनी माध्यमांशी शी बोलताना केला.
नौदलाकडून चुकीच्या पद्धतीने अत्यंत वेगात आणि वेडीवाकडी बोट चालवली जाते. यावेळीसुद्धा हेच झाले, असा आरोप प्रत्यक्षदर्शी आणि दुसऱ्या बोटीचे चालक सुभाष मोरे यांनी केला आहे.
नौदलाच्या बोटचालकावर गुन्हा दाखल
नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेमुळे नीलकमल बोट बुडून अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. नौदलाच्या स्पीड बोटीवरील चालक आणि संबंधितांविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन मृत महिला आणि एका मृत पुरुषाची ओळख पटलेली नाही.
नौदलाच्या बोटीवर सहाजण होते. त्यांपैकी एका नौदल अधिकाऱ्यासह दोन खासगी साहित्य पुरवठादार कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असे कुलाबा पोलिसांनी सांगितले. एक नौदल अधिकारी गंभीर आहे. नीलकमल बोटीवर ८० जणांची क्षमता असताना त्यावर क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. ८० जणांना तिकीट दिल्याची नोंद आहे. तसेच १२ वर्षांखालील मुलांचे तिकीट नसल्याने त्याची नोंद नव्हती.
दोघांचा शोध सुरू आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या तिघांपैकी एक असलेल्या नाथाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून कुलाबा पोलिसांनी १०६ (१), १२५ (अ) (ब), २८२, ३२४ (३) (५) बीएनएस अंतर्गत नौदल स्पीड बोटीवरील चालक आणि संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
प्रवक्ता, नौदल
तटरक्षक दल, सागरी पोलिस, नौदलाचे चार हेलिकॉप्टर आणि ११ बोटी, एक तटरक्षक नौका आणि तीन सागरी पोलिस नौकाद्वारे बचावकार्य सुरु आहे. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
जयंत पाटील, माजी आमदार
गेट ऑफ इंडियावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि बोटीच्या सुरक्षिततेसाठी मेरीटाइम बोर्ड आणि तटरक्षक दलाने यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.
मृतकांची नावे खालील प्रमाणे
1) महेंद्रसिंग शेखावत (नौदल)
2) प्रवीण शर्मा (बोटीवरील कामगार)
3) मंगेश (बोटीवरील कामगार)
4) मोहम्मद रेहान कुरेशी
5) साफियाना पठाण
6) माही पावरा (वय ३)
7) अक्षता राकेश अहिरे
8) राकेश नानाजी अहिरे
9) मिथू राकेश अहिरे (वय८)
10) दीपक व्ही. व अन्य
