शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक टीका, अनादर खपवून घेणार नाही : अजित पवार

संग्रहित छायाचित्र.

मुंबई वृत्तसेवा, दि. 07 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर असभ्य शब्दांत टीका केल्याप्रकरणी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाशिव खोत यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी निषेध केला आहे. शरद पवार यांच्यावरील वैयक्तिक टीका किंवा अनादर खपवून घेणार नाही, या शब्दात अजित पवार यांनी खोत यांचे कान टोचले आहेत.

शरद पवार यांच्या विषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाशिव खोत यांनी केलेले वक्तव्य हे निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर शरद पवारांवर वैयक्तिक टीका करणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरीत्या मी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करतो. यापुढे अशी कोणी खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही’, असे अजित पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. अजित पवार यांनी महायुतीचेच घटक असलेल्या सदाशिव खोत यांना चांगलेच सुनावले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रचारसभेत सदाशिव खोत यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. सदाशिव खोत हे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष असून भाजपचे विधान परिषद आमदार आहेत. खोत यांनी यापूर्वी शरद पवार यांच्यावर अनेकदा शेलक्या शब्दांत टीका केलेली आहे.

Leave a Comment

और पढ़ें