सडक अर्जुनी, दिनांक : 24 ऑक्टोंबर 2024 : राज्यात निवडणुकीचे वारे सुरू असतानाच मोठे बदल होत आहेत, काही ठिकाणी विद्यमान आमदारांच्या तिकिटा कापल्या जात असून काहींना पक्ष बदलून तिकीटा वाटप करण्याचा कार्यक्रम राज्यात महाविकास आघाडी तसेच महायुती कडून केला जात आहे, आणि अशातच ज्यांची उमेदवारी डावलण्यात आली ते नेते आता दुसऱ्या पक्षाकडे उमेदवारीसाठी धावपळ करीत असल्याचे चित्र आहे.
https://x.com/maharashtrakes1/status/1849315239655055527?t=Vq-5HWUB0xRAb6HNuIxMHQ&s=09
अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी आज विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली, चंद्रिकापुरे हे राष्ट्रवादी पक्षाचे अजित पवार गटा चे विद्यमान आमदार आहेत मात्र महायुती कडून त्यांना अर्जुनी मोरगाव विधानसभेची उमेदवारी डावलण्यात आली आहे, तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी नुकतेच दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये पक्षप्रवेश केले तसेच राष्ट्रवादी कडून त्यांना अर्जुनी मोरगाव विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
त्यामुळे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत आणि त्यांना या भागातील उमेदवारी मिळाल्यास ते काँग्रेसमध्ये देखील प्रवेश करू शकतात हे नाकारता येत नाही, त्यांनी टीव्ही 9 शी बोलताना तसं सांगितलं आहे मात्र अद्याप तरी त्यांची उमेदवारी या भागात निश्चित झाली नाही.
त्यांनी आज काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली यावरून असे लक्षात येते की आमदार मनोहर चंद्रिकापुरे तसेच त्यांचे सुपुत्र निवडणुकीला लक्षात घेता चिंतेत आहेत, कुठल्याही पक्षातून तिकीट न मिळाल्यास आमदार मनोहर चंद्रिकापुरे किंवा त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत देखील असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या भागात महायुती आणि महाविकास आघाडी तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, येत्या निवडणुकीमध्ये जनता कुणाला पसंती दाखवणार हे पाहण्यासारखे असेल.
