मुंबई, वृत्तसेवा, दि. 10 ऑक्टोंबर : टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय रतन टाटा हे गेल्या काही दिवसात हॉस्पिटलला तपासणीसाठी जात होते आणि त्यांनी सांगितले होते की, त्यांच वय आणि संबंधित आरोग्य स्थिती लक्षात घेऊन त्यांची हॉस्पिटलची भेट ही नियमित वैद्यकीय तपासणीचा एक भाग आहे. मात्र, आता नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे निधन झाले आहे. अशी माहिती सकाळ डिजिटल ने प्रसारित करीत दिली आहे.
https://x.com/PTI_News/status/1844079357175742945?t=T-NWt-eWNdii_XUF02Ib2Q&s=19
रतन टाटा हे भारतीय उद्योग क्षेत्रातील एक मोठे व्यक्तिमत्व होते. ते 1991 मध्ये भारतातील सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रभावशाली समूहांपैकी एक असलेल्या टाटा सन्सचे अध्यक्ष बनले आणि 2012 पर्यंत त्यांनी समूहाचे नेतृत्व केले होते. त्यांच्या कार्यकाळात, टाटा समूहाचा जागतिक स्तरावर विस्तार झाला, टेटली, कोरस आणि जग्वार लँड रोव्हर यांसारख्या मोठ्या कंपन्यांचे अधिग्रहण करून, टाटा मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत कंपनीपासून जागतिक पॉवरहाऊसमध्ये बदलले.
रतन टाटा यांचा जन्म 1937 मध्ये सुप्रसिद्ध पारशी टाटा कुटुंबात झाला. त्यांचे वडील नवल टाटा आणि आई सुनी टाटा. लहान वयातच त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची सूत्रे हाती घेतली. प्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून आर्किटेक्चरमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
रतन टाटा 1962 मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि त्यांच्या कौशल्यामुळे आणि समूहामध्ये त्यांना मिळालेल्या विविध अनुभवांमुळे हळूहळू त्यांनी प्रगती केली. 1991 मध्ये, त्यांची टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.
यानंतर टाटा समूहात अनेक मोठे बदल झाले आणि रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने मोठा विस्तार केला. नवीन व्यवसायांमध्ये प्रवेश करण्याबरोबरच, त्यांनी प्रतिष्ठित जग्वार लँड रोव्हर आणि कोरस स्टील सारखे मोठे अधिग्रहण देखील केले, ज्यामुळे टाटा समूहाने जागतिक व्यासपीठावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
रतन टाटांबद्दल बोलायचं झालं तर नॅनो कारचा उल्लेख नक्कीच येईल. रतन टाटा यांची विचारसरणी नेहमीच फक्त नफा मिळवण्यासाठी राहिली नाही. सामाजिक जबाबदाऱ्यांसाठी ते कटिबद्ध होते. या दूरदृष्टीमुळे त्यांनी टाटा नॅनोसारख्या परवडणाऱ्या कारचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. 1 लाख रुपयांची टाटा नॅनो केवळ रस्त्यावरच आली नाही तर आपल्या प्रतिस्पर्ध्यांना बजेट कार बाजारात आणण्यास भाग पाडले. टाटाच्या आयकॉनिक टाटा इंडिकालाही भारतीय कार म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळाली.
समाजासाठी केलेलं कार्य आणि परउपकारी
विचारांमुळे ते टाटा ट्रस्टला जगभरात ओळख मिळवून देऊ शकले. टाटा ट्रस्ट, जगभरातील सर्वात मोठ्या एनजीओपैकी एक आहे. ट्रस्ट आरोग्यसेवा, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करते.
2012 मध्ये टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतरही रतन टाटा कंपनीसाठी सर्वात मोठे मार्गदर्शक म्हणून काम करत होते. याशिवाय एनजीओच्या कामातही ते सक्रीय होते. त्यांना भटक्या श्वानांची खूप आवड होती आणि त्यासाठी त्यांनी खूप काम केले आहे.
देशातील सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे लग्न झालेले नव्हते. एकदा एका मुलाखतीत त्यांनी स्वतः सांगितले होते की, ते 4 वेळा लग्न करणार होते पण काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. ते म्हणाले होते की, 1962 मध्ये ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते आणि लग्न करणार होते पण भारत-चीन युद्धानंतर मुलीच्या कुटुंबाने मुलीला भारतात येण्यास नकार दिला होता. त्यामुळे लग्न होऊ शकले नाही.