साकोली, दि. 22 सप्टेंबर : वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्य अंतर्गत सहवनक्षेत्र नागझिरा संकुल, नियत क्षेत्र नागझिरा 1, कक्ष क्र. 96 मधील मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात विटरक्षक जे. एस. केंद्र, नागझिरा, हे आपल्या चमुसह नियमीत गस्ती वर असतांना साधारणत आज दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 10 च्या दरम्यान एक नर वाघ अंदाजे वय वर्षे 9 ते 10 मृत अवस्थेत दिसून आला, सदर घटनेबाबत माहिती बिटरक्षक केंद्रे यांनी तात्काळ वरिष्ठ वनअधिकारी यांना कळविली असल्याची माहिती वन विभाग साकोली यांनी प्रेस नोट द्वारे दिली आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच जयरामे गौडाआर, उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया, राहुल गवई, उपसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, साकोली, कु. एम. एस. चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक, (अति. कार्य.), नागझिरा वन्यजीव अभयारण्य, साकोली, श्री. व्ही.एम. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, साकोली हे घटनास्थळी दाखल झाले.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभुत कार्यपध्दतीनुसार गठीत समितीद्वारे घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी करण्यात आली. सदर समितीमध्ये सावन बहेकार, मानद वन्यजीव रक्षक तथा प्रतिनिधी मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य नागपूर, रुपेश निंबार्ते, NTCA प्रतिनिधी, छत्रपाल चौधरी, NGO प्रतिनिधी, डॉ शितल वानखेडे, डॉ. सौरभ कवठे, डॉ. समिर शेंद्रे, डॉ. उज्वल बावनथडे, पशुवैद्यकिय अधिकारी यांचा समावेश होता.
पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांचे चमुद्वारे समिती सदस्यांचे उपस्थितीत मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले व वाघाचे व्हिसेरा सॅम्पल उत्तरीय तपासणी करीता संकलित करण्यात आले आहेत.
मृत नर वाघ हा 1- 9 असून आपसी झुंजीमध्ये गंभीर रित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला असवा असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव साबुत अवस्थेत आढळून आलेले असून शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणी तपास राहुल गवई, उपसंचालक, नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, यांचे मार्गदर्शनात व्ही. एम. भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा हे करीत आहेत.