- काँग्रेस प्रवेशाचे संकेत, पत्रकार परिषदेत करणार खुलासा, गोदियात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसरा धक्का…
गोंदिया, दि. 08 सप्टेंबर : विधानसभा निवडणूक जवळ येत असताना आणखी एक माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. जस जशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे, तसे भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या विदर्भातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जाणारे एक एक नेते सध्या पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
मागील महिन्यात पूर्व विदर्भातून भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करून फडणवीस यांना एक प्रकारे धक्का दिला होता. तर आता आणखी एक माजी आमदार भाजपची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार आगामी 13 तारखेला माजी आमदार गोपाल अग्रवाल काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत मिळत आहेत.
गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे 2004, 2009 आणि 2014 वर्षात सलग तीन वेळा आमदार राहून चुकले गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसच्या पक्षामार्फत निवडणूक जिंकलेली आहे. ते विधिमंडळाच्या लोकलेखा समितीचे (पीएसी) अध्यक्षही होते. सलग दोन टर्म भंडारा- गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेचे आमदार पण राहिलेले आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश करून कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली मात्र निवडणुकीत पराभूत झाले. 2019 च्या दारुण पराभवानंतर संबंधित आमदार राजकीय अज्ञातवासात गेले. आपलं नाव डावलून विधानसभा सदस्यांमार्फत निवडून द्यावयाच्या विधानपरिषद उमेदवारीवर माजी मंत्री परिणय फुके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच संबंधित आमदारांची नाराजी ही अधिकच वाढत गेली.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षामार्फत तिकीट मिळेल की नाही याची शाश्वती नसल्याने माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची अस्वस्थता पक्षांतर करायला कारणीभूत ठरते आहे. त्याचबरोबर माजी आमदार रमेश कुथे यांनी सुद्धा भाजपला राम राम ठोकत घर वापसी करत उबाठा शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांची अस्वस्थता आणखीनच वाढली असं पण बोललं जातंय.
सूत्रांच्या माहिती नुसार माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांची काँग्रेस घरवापसी संदर्भात दुजोरा मिळालेला असून आज 8 सप्टेंबर रोजी दुपारी पत्रकार परिषदेत ते या संबंधी खुलासा करणार आहेत. सध्याच्या स्थितीत गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे विनोद अग्रवाल अपक्ष आमदार आहेत. त्यांचा भाजपला पाठिंबा आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस मार्फत पूर्व विदर्भात मोठ्या हालचाली सुरू असल्याचं समजतंय. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या पक्षप्रवेश मागे आणखी कोणते समीकरणे असणार हे सुद्धा बघण्यायोग्य ठरणार आहे.
