सडक अर्जुनी, दि. 05 सप्टेंबर : मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या तरुणासोबत दुःखद घटना घडली, ही धक्कादायक घटना सडक अर्जुनी तालुक्यात ग्राम मशानझुरवा जंगल परिसरात घडली असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली, जंगल शिवारातील नाल्यावर आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे.
मृतक पंकज छबिलाल गजभिये वय वर्ष २३ मु. बाम्हणी असं मृत युवकाचं नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी हि घटना घडल्याने बाम्हणी गावात एकच शोककळा पसरली, पोळ्याचा पाडवा असल्याने सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी येथील काही युवक जवळील खडकीटोला परिसरातील मशानझुरवा जंगल शिवारातील नाल्यामध्ये दि. 03 सप्टेंबर रोजी आंघोळ करण्यासाठी गेले होते.
पंकज गजभिये देखील मित्रांसोबत आंघोळीसाठी नाल्यावर गेला. मात्र, आंघोळ करत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती देवरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंकजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली असून या घटनेमुळे गजभिये कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या युवकाचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला आहे.