गोंदिया जिल्ह्यातील १० कृषी केंद्रांचे परवाने निलंबित! 

  • कृषी विभागाची कारवाई, तपासणी मोहिमेदरम्यान आढळली अनियमितता.

गोंदिया, दि. 05 सप्टेंबर : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथक स्थापन केली आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये २६ गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे. या गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषी केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहीम जिल्ह्यात राबविली जात आहे. याच मोहिमेदरम्यान नियमाचे उल्लघंन करणाऱ्या १० कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले.

कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नूतनीकरण न करणे, कृषी सेवा केंद्र शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषी साहित्याचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणांमुळे १० निविष्ठा धारकांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाकडून माध्यमांना देण्यात आली आहे.

अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी. – शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषि सेवा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमुद एमआरपी प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपी पेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायद्यानुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Comment

और पढ़ें