गोंदिया, दि. 20 ऑगस्ट : शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत अकुशल कामे पूर्ण होऊन चक्क दोन महिने लोटून देखील या कामावरील मजुरांना मजुरी न मिळाल्याने सर्वत्र असंतोष निर्माण झाला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदित करून मजुरांना तात्काळ मजुरी उपलब्ध करून देण्याची मागणी दि. 23, 07, 2024 रोजी केली होती.
या मागणीची दखल घेत शासनाने गत दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील हजारो मजुरांच्या खात्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजने च्या अकुशल कामांतर्गत मजुरी ची रक्कम जमा केली आहे. सविस्तर असे की यंदा उन्हाळ्यात शासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील बहुसंख्य ग्रामपंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अकुशल कामे करण्यात आली होती. हजारो मजुरांनी केलेलं काम पूर्ण होऊन तब्बल दोन महिन्याचा कालावधी लोटून देखील या कामावरील मजुरांना शासनाकडून मजुरी उपलब्ध झाली नव्हती.
यासंबंधी जिल्ह्यातील हजारो मजुरांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्याकडे कैफियत मांडून अकुशल कामांची मजुरी रक्कम उपलब्ध होण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी मागील महिन्यात गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन देऊन अकुशलकामांतर्गत मजुरी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक कार्यवाहीची मागणी केली होती. सदर मागणीची दखल घेत शासनाने मागील दोन दिवसापूर्वी गोंदिया जिल्ह्यातील हजारो मजुरांच्या बँक खात्यात मजुरीची रक्कम जमा केल्याने मेश्राम यांच्या प्रयत्नाला यश आल्याची चर्चा असून मजुरात सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
