- NHAI आणि अशोका कंपनीचा अजब कारभार.
- उड्डाण पुलखोदून थातुर मातुर पद्धतीने सर्विस मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती.
गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दि. 13 ऑगस्ट 2024 : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम सौंदड येथे उड्डाण पुलाचे नव निर्माण कार्य गेली 5 ते 6 वर्षे पासून राजदीप कंपनी कडून सुरू होते, आता हे काम गेली अनेक महिन्यांपासून बंद आहे. Nhai च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजदीप कंपनीला ब्लॅकलिस्टेट करण्यात आले आहे, त्यामुळे या उड्डाण पुलाचे काम सुरू करण्याकरिता, टेंडर प्रक्रिया झाल्यानंतर काम सुरू होईल. आता उड्डाण पुलाचे काम बंद असल्यामुळे बाजूने जाणाऱ्या सर्विस मार्गाची संपूर्ण दयनीय अवस्था झाली असून सदर मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत.
सदर उड्डाण पुलाचे काम तात्काळ सुरू व्हावे, आणि सर्विस मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवावे, या मागणीला घेऊन 3 ऑगस्ट रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार डॉ. प्रशांत पडोळे, तसेच आमदार अभिजीत वंजारी यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी महामार्गावरील रेल्वे मार्गावर, रेल्वे रोको तसेच महामार्ग रोको आंदोलन केले होते, जर तीन दिवसात सदर मार्गाचे व उड्डाणपुलाचे काम सुरू न झाल्यास काँग्रेसच्या वतीने पुन्हा आंदोलन करण्यात येणार असा इशारा दरम्यान NHAI च्या अधिकाऱ्यांना आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले होते. तब्बल 9 ते 10 दिवस लोटले असेले तरी उड्डाण पुलाचे काम अद्याप सुरू झाले नाही.
काँग्रेसच्या आंदोलनाला NHAI कडून केराची टोपली?
गोंदिया जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू करण्याबाबत तसेच सर्विस रोडच्या दुरुस्तीबाबत मागण्या घेऊन सौंदड येतील महामार्गावर आंदोलन केले होते, तीन दिवसात सदर काम सुरू झाले नाही तर पुन्हा या ठिकाणी आंदोलन केले जाईल असे आश्वासन काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकारांशी बोलताना देण्यात आले होते.
मात्र आता आंदोलन होऊन तब्बल नऊ ते दहा दिवस लोटले असले तरी या ठिकाणी अद्यापही काम सुरू झाल्याचे चित्र दिसत नाही, मात्र उड्डाण पुलावर टाकलेले मटेरियल जेसीबीच्या माध्यमाने खोदून ते मटेरियल सर्विस मार्गावर टाकून गड्डे भरण्याचे काम आंदोलन होण्यापूर्वीपासून सुरू आहे. तर सदर खड्डे बुजवीण्याचे काम थातुर मातुर पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या आंदोलनामुळे NHAI आणि अशोका या कंपनीला कुठलाही फरक पडला नाही, असे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी शेकडो खड्डे पडले असले तरी टोल वसुलीचे काम जोरात सुरू आहे.
त्यामुळे काँग्रेस पक्ष आता कधी आंदोलन करणार याकडे सौंदड वाशीयांचे लक्ष लागले आहे. खासदार प्रशांत पडोळे यांच्याशी आम्ही भ्रमणध्वनी वरून संपर्क केला असता त्यांच्याशी कुठलाही संपर्क होऊ शकला नाही. विशेष म्हणजे याच मार्गावर धुळीचे साम्राज्य देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे. यामुळे परिसरात राहणाऱ्या व मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना फुफसाचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जात आहे. त्यामुळे आता तरी सत्ताधारी या प्रकाराला गांभीर्याने लक्षात घेतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
- मधुसूदन दोनोडे, अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी सडक अर्जुनी
खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आज राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही पुलांचे आढावा घेण्याकरिता येत आहेत, सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड व देवरी तालुक्यातील मासुलकसा घाट या दोन्ही पुलांची पाहणी करणार आहेत.