घरोघरी पोहचत नागरिकांच्या जाणून घेतल्या समस्या.
गोंदिया, दि. 09 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत फुट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे २ गट पडले. गोंदिया जिल्ह्यातील प्रफुल्ल पटेल व राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या आमदारांनी अजित पवार गटाला समर्थन दिल्याने शरदचंद्र पवारांची राष्ट्रवादी एकटी पडली. शरदचंद्र पवार यांची राष्ट्रवादी जिल्ह्यातून संपते की काय अशीच चर्चा सर्वत्र होऊ लागली. अशात कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाचा हात न सोडता शरदचंद्र पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गोंदियात जिवंत ठेवली. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक यांच्या विषयी शरद पवारांचे विचार व राजकारणा पलीकडे जाऊन समाजकारण करून सर्वांना समृद्ध करण्याची शरदचंद्र पवार यांची विचारसरणी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते गोंदिया जिल्ह्यातील घराघरापर्यंत पोहोचवीत आहेत.
सविस्तर असे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार व शरदचंद्र पवार असे राष्ट्रवादीत २ गट पडले. शरदचंद्र पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार गटासोबत गेले. प्रफुल्ल पटेल अजित पवार गटात गेल्याने गोंदिया जिल्ह्यातील शरदचंद्र पवार यांची विचारसरणी असलेले मतदार मोठ्या प्रमाणात नाराज झाले.
शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवणाऱ्या मतदारांनी शरदचंद्र पवार यांच्याशी थेट भेट घेत आम्ही तुमच्या कायम पाठीशी आहोत असा धीर दिला. लोकसभा निवडणुकीत या मतदारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा जोमाने प्रचार केला व त्याला प्रचंड मताधिक्याने निवडून देखील आणले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे विचार शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, युवक – युवती, महिला यांविषयी प्रेरक असून राजकारणा पलीकडे जाऊन या घटकांच्या उन्नतीसाठी मदत करणारे आहे. जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी दुसऱ्या गटात असतांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे विचार नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शरदचंद्र पवार यांची फौज कामाला लागली आहे.
तथापि, हे पदाधिकारी जिल्ह्यातील गावोगावी पोहचत आहेत. नागरिकांच्या भेटी घेत आहेत. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून व प्रत्यक्षरीत्या भेटून समस्या सोडवून देत आहेत. काही समस्या वरिष्ठ पातळीवरच्या असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना त्या समस्या सांगून येत्या काळात त्या समस्या सोडविण्यासाठी आग्रह करीत आहेत.
या भागातील विद्यमान जनप्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहचत नसून कोणत्याही पदावर कार्यरत नसलेले मात्र शरदचंद्र पवार यांच्या विचारांशी जुळलेले नागरिक आपल्यापर्यंत येऊन आपल्या समस्या ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढत असल्याने नागरिक देखील त्यांना आपल्या समस्या मोठ्या हिरहिरीने सांगत आहेत. येणाऱ्या काळात आम्ही शरदचंद्र पवार यांच्या विचारसरणीवर काम करणाऱ्या माणसासोबत उभे राहू असे नागरिक ठासून सांगत आहेत.