सडक अर्जुनी, दिनांक : 08 ऑगस्ट 2024 : पावसाळा लागला की सरपटणारे जीव व किळे घराच्या दिशेने येतात, यामध्ये मुख्यत साप असतात, आणि साप दिसले की भीतीमुळे नागरिक भयभीत होतात, आणि भयभीत झाल्यानंतर सापाला मारण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु सापाला मारू नये, त्यांना जीवदान द्या, ते प्रकृतीचे घटक आहेत, असा संदेश देणारे सौंदड येथील सर्प मित्र पराग लाडे यांनी शेकडो सापांना जीवदान दिले आहे.
आज दिनांक 8 ऑगस्ट रोजी सौंदड येथील महिला पोलीस पाटील सीमा मोहन निंबेकर यांच्या घरी एक साप दिसल्याने ते भीतीमुळे गोंधळून गेले होते, विशेष म्हणजे त्यांचे घर गावाच्या बाहेर शेतात आहे, परसोडी कडे जाणाऱ्या मार्गावर आहे, गावातील सर्पमित्र पराग लाडे हे साप पकडून त्यांना जीवदान देतात अशी माहिती त्यांना मिळाली असता, त्यांनी सर्पमित्र पराग लाडे, यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क करून त्यांच्या घरी एक साप असल्याची माहिती दिली.
पराग लाडे यांनी त्यांच्या घरी असलेले साप पकडले परंतु सदर साप हे बिनविषारी होते, याची माहिती त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली, परंतु साप दिसल्यानंतर तो विषारी आहे की बिनविषारी याचा कुणालाही अंदाज नसतो, आणि त्यामुळे घाबरून जाऊन अनेक जण सापाला मारण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यामुळेच प्रकृतीचा समतोल बिघडत आहे, त्यामुळे पराग लाडे यांनी सापाला मारू नका त्यांना जीवदान द्या. असा संदेश उपस्थित नागरिकांना दिला आहे.
जीवाची बाजी लावून सर्पमित्र सापाला पकडून राणावनात सोडून देतात, त्याचबरोबर नागरिकांचे संरक्षण करतात, त्यांना जनजागृती करण्याचे संदेश देतात, मात्र शासनाच्या वतीने त्यांना कुठल्याही प्रकारचे, मानधन देण्यात येत नाही, त्यामुळे सर्पमित्रांनी आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न आहे.
आज पराग लाडे यांनी पकडलेल्या सापाला सिंधीपार येथील रानावनात सोडून दिले आहे, त्यांच्यासोबत सर्पमित्र विक्की चूटे, संघर्ष जणबंधू, रोहित मारवाडे उपस्थित होते. पकडलेला साप हा धामण जातीचा असून बिनविषारी आहे तर तो जवळपास 8 फूट इतका लांब असल्याची माहिती सौंदड येथील सर्पमित्र पराग लाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.