झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात, अनेकजण जख्मी, बचाव कार्य सुरू

नवी दिल्ली, वृत्तसेवा, दि. 30 जुलै : झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथील टाटानगरच्या जवळ असलेल्या सरायखेलामध्ये रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहेत. ही रेल्वे हावड्यावरून (पश्चिम बंगाल) मुंबईला जात होती. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जण जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचार प्रदान केले जात आहेत. तसेच काही रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. हावडा सीएसएमटी एक्सप्रेस, ट्रेन नंबर १२८१० ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील राजखरसावां जंक्शनजवळ रुळावरून घसरली. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी व स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. लोकसत्ताने दीलेल्या माहिती नुसार या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेलं जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. टाटानगर : 06572290324, चक्रधरपूर : 06587 238072, हावडा : 9433357920 व रांची : 0651-27-87115 हे हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत.

प्रत्यक्षदर्शीनी या अपघाताबाबत सांगितलं की, रात्री काही प्रवासी रेल्वेस्थानकावर झोपले होते. ३.४५ च्या सुमारास मोठा आवाज आला. आम्ही आवाजाच्या दिशेने पाहिलं तर रेल्वे हलताना दिसली. रेल्वे एका बाजूला झुकली होती, काही प्रवासी पडतायत असं वाटत होतं. रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की सर्व जखमी प्रवाशांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. हा अपघात कशामुळे झाला? यामध्ये कोणाची चूक होती? या गोष्टींचा तपास केला जात आहे. ही बातमी प्रसिद्ध करत असताना बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं.

ही मेल हावड्यावरून मुंबईला जात होती. रात्री ही मेल राजखरसावां जंक्शनमधून निघाली. सकाळी पावणेचारच्या सुमारास रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले. या दुर्घटनेची माहिती मिळताच चक्रधरपूर रेल्वे मुख्यालयातील अधिकारी हादरले. तिथल्या वरिष्ठांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं एक पथक घटनास्थळी रवाना केलं. मदतीसाठी सकाळी सव्वाचार वाजता एआरएमई रेल्वे घटनास्थळी रवाना करण्यात आली. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारांसाठी चक्रधरपूर रेल्वे रुग्णालय व खरसावनच्या शासकीय आरोग्य केंद्रात नेण्यात आलं आहे.

Leave a Comment

और पढ़ें