- ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता
नवी मुंबई, दि. २९ जुलै : विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील जनतेला राज्य सरकारचा आनंदाचा शिधा मिळणार आहे. गणेशोत्सवात राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना आनंदाचा शिधा वाटला जाणार आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळं सर्व जनतेपर्यंत गणेशोत्सवात आनंदाचा शिधा पोहोचविण्याच्या राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे.
१०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चनाडाळ आणि खाद्यतेल लोकांपर्यंत पोहचविण्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेला वेग आला आहे. टेंडर प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथील केल्याने यावेळी ९ कंपन्यां टेंडर प्रक्रियेत सहभागी झाल्या आहेत. यापूर्वी केवळ दोन ते तीन कंपन्या टेंडर प्रक्रियेत सहभागी होत होत्या.
आनंदाचा शिधा हा निकृष्ट दर्जाचा आणि खूप उशिरा वितरीत होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तसंच विरोधकांकडून आरोप झाले होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर यावेळी असे प्रकार घडू नयेत याची काळजी सरकार घेत आहे, याच पार्श्वभूमीर टेंडर प्रक्रियेतील अटी आणि शर्थी शिथील करण्यात आल्यानं यंदा या टेंडर प्रक्रियेत तब्बल ९ कंपन्यांनी सहभाग नोदंवला आहे. राज्यातील १ कोटी ७० लाख कुटुंबांना आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार आहे.