गोंदिया, दि. २५ जुलै : यंदाच्या उन्हाळी हंगामात गोंदिया जिल्ह्यातील हजारों शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार धानाची विक्री केली होती. मात्र विक्री झालेल्या धान पिकाचे मागील दीड ते दोन महिन्यापासून चुकारे अदा न करण्यात आल्याने ऐन खरिपाचे तोंडावर धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. या प्रकरणी गोंदिया जिल्ह्याचे राका ( शरद पवार ) चे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी सातत्याने जिल्हा पणन विभागासह शासनाच्या मार्केटिंग फेडरेशनला निवेदने पाठवून शेतकऱ्यांचे धान चूकारे तात्काळ अदा करण्याची मागणी लावून धरली होती.
अखेर या मागणीला यश येवून गोंदिया जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या एकूण ९७ कोटी रुपयांच्या धान चुकाऱ्यापैकी सुमारे ८५ कोटी रुपयाचे धान चुकारें शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. प्राप्त माहितीनुसार शासनाच्या आधारभूत किंमत योजनेनुसार यंदा गोंदिया जिल्ह्यातील उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते.
मात्र यंदा आधारभूत किंमत योजनेच्या तुलनेत खुल्या बाजारात उन्हाळी धान पिकाला अधिक किंमत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी संबंधित केंद्रांकडे पाठ फिरविली होती. तथापि काही शेतकऱ्यांनी आधारभूत किंमत योजनेनुसार धानाची विक्री केली होती. दरम्यान शासनाच्या आधारभूत किंमातीनुसार उन्हाळी धानाची विक्री होवून तब्बल दीड महिन्यांहून अधिक कालावधी लोटला असतांना देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धान चुकारे जमा न झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत होते.
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर धान चुकारे थकीत झाल्याने खरीप अंतर्गत शेत मशागत ते पीक पेरणी कशी करावी या विवंचनेत शेतकरी दिसून येत होते. या प्रकरणी गोंदिया जिल्हा राका (शरद पवार गटाचे ) कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी पुढाकार घेत शासनाच्या पणन विभागाला शेतकऱ्यांचे थकीत चुकारे तात्काळ अदा करण्याची मागणी लावून धरली होती.
या मागणीची दखल घेत शासनाच्या पणन महामंडळ अंतर्गत जिल्ह्यातील हजारों शेतकऱ्यांचे सुमारे ८५ कोटी रुपयाचे धान चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. दरम्यान मागील दीड महिन्याने अधिक कालावधीपासून रखडलेले धान चुकारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.