सौंदड येथील नागरिकांना नळ योजनेद्वारे पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा !

सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे )  दिनांक : 21 जुलै 2024 : दहा हजारच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या सौंदड गावामध्ये पावसाळा लागल्यापासून नागरिकांना पिण्यासाठी नळ योजनेद्वारे सोडण्यात येणारे पिण्याचे पाणी गढूळ येत असल्याने गावातील नागरिक आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या समस्येला लक्षात घेता पिण्याचे पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य पुरवठा करावे अशी मागणी होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. गढूळ पाणी पिल्याने जलजन्य आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने गावातील नागरिकांच्या आरोग्यकडे लक्ष देत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे.

उन्हाळ्यामध्ये गावातील नागरिकांना नळ योजनेच्या माध्यमातून नियमित पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात आले होते. ते पाणी एका शेतकऱ्याच्या शेतातील बोरवेलचे होते, मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून शेतकऱ्याच्या शेतातील पाणी बंद करण्यात आले आहे.

नदीला आलेल्या पुरामुळे विद्युत पंपाच्या विहिरीत गढूळ पाणी भरले आणि तेच पाणी विद्युत पंपाच्या माध्यमातून गावातील पाणी साठवणूक करणाऱ्या पाणी टाकीमध्ये साठवणूक केल जाते तर तेच पाणी गावातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केले जाते, सौंदड ग्रामपंचायत येथील पाणीवाटप करणारे कर्मचारी यांनी सांगितलं की टाकीमध्ये जमा झालेले पाणी स्वच्छ व्हावे यासाठी ब्लिचिंग पावडर व तुरटी टाकून स्वच्छ केली जाते मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाणी स्वच्छ होत नाही. आणि तेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केला जाते. आता हे गढूळ पाणी जर नागरिक पीत असतील तर आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शुद्ध व थंडगार पाणी गावातील शेवटच्या वार्डामध्ये मिळते ?

गावामध्ये तीन ते चार ठिकाणी नागरिकांना पिण्यासाठी सुद्ध जल उपलब्ध व्हावे यासाठी वॉटर प्युरिफायर बसवण्यात आले होते. मात्र त्यातील एकच वाटर प्युरिफायर सध्या सुरू असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे हे शुद्ध व थंडगार पाणी गावातील शेवटच्या वार्डामध्ये बसवण्यात आले आहे. तत्कालीन सरपंच यांनी आपल्या मतदारांना व कार्यकर्त्यांना याचा फायदा व्हावा यासाठी त्या भागात ही मशीन बसविली अशी चर्चा निवडणूक काळात गावामध्ये होती. आणि त्याच वार्डात निवडणुकीमध्ये त्यांना फायदाही झाला. 

सदर मशीन जर गावाच्या मध्यभागी असती तर त्याचा फायदा संपूर्ण गावाला झाला असता, सौंदड गाव हे एक ते दोन किलोमीटर लांब असं पसरले आहे. त्यामुळे गावातील नागरिक लांबून पाणी वाहतूक करणे पसंत करत नाही. परिणामी नळाला आलेले अशुद्ध पाणी पितात ! ,  हे पाणी उकळून व तुरटी फिरवून पिण्यासाठी वापर केल्यास जलजन्य आजारापासून दूर राहता येते मात्र असे कित्येक नागरिक करणार हेही तितकंच महत्त्वाचं आहे.

कारण ग्रामीण भागातील नागरिक हे शेतकरी असल्याने त्यांच्याकडे अधिकचा वेळ राहत नाही. तर दुसरीकडे शिक्षणाचा अभाव देखील, चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्यास फरक पडते, परिणामी नळाला आलेले गढूळ पाणी पिण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने नागरिकांच्या समस्येला लक्षात घेता, नळ योजनेद्वारे नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे. 

Leave a Comment

और पढ़ें