गोंदिया, दी. 08 जून : आई – वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात. हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं. मात्र, कधीकधी अशा काही घटना समोर येतात, ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे ( वय 48 ) यांना दारू पिण्याची सवय होती. मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं.
या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे याने गुरुवारी ( 6 जून रोजी ) आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला. यानंतर दुकान बंद करून निघून गेला. यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून दोन दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिला. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली, त्यावेळी राकेशवर संशय आला आणि स्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला, राकेश कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.