तलाठी मुस्ताक कुरेशी यांच्या निदर्शनास वाळूची वाहतूक, चोरी झालेल्या वाळूचे जबाबदार कोण ?
सडक अर्जुनी, ( बबलु मारवाडे ) दि. 05 मे 2024 : तालुक्यातील ग्राम पळसगाव शेत शिवारात वाळूचे मोठे ढीग असल्याची माहिती महाराष्ट्र केसरी न्यूज ने महसूल विभागाला 25 एप्रिल रोजी दिली, ही वाळू चुलबंद नदीच्या नदीपात्रातून उपसा करून वाहतूक करण्यासाठी अवैध रित्या साठवण करून ठेवण्यात आली होती.
दिलेल्या माहितीवरून महसूल विभागाचे अधिकारी वरून कुमार शहारे यांनी मिळालेल्या वाळूचे पंचनामे करण्या साठी तोंडी आदेश सौंदड येथील तलाठी मुस्ताक कुरेशी साजा क्रमांक : 6 यांना दिले, कुरेशी यांनी घटना स्थळी जाऊन 3 ते 4 वाळू ढीगांचे पंचनामे केले. यात तब्बल 75 ब्रास पेक्षा जास्त वाळू उपलब्ध असताना देखील अंदाजे 75 ब्रास वाळू उपलब्ध असल्याचे पंचनाम्यात उल्लेख केले. मिळालेली वाळू ही महसूल विभागाच्या 5400 रेट नुसार 4 लाख 50 हजार रुपयाची होती. त्यावर पाच पट दंड आकारल्यानंतर दंडाची रक्कम ही 20 लाख 25 हजार रुपये एवढी झाली होती. जप्ती मध्ये मिळालेली 15 ब्रास वाळू एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये मिळाली होती त्यावर देखील दंड आकारण्यात आला नाही हे विशेष. आकारण्यात आलेला दंड हा अज्ञात व्यक्तीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
सदर ठिकाणी साठवून ठेवलेली वाळू स्थानिक पोलीस पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आली होती. तर दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात नेण्याकरिता एका ठेकेदाराला पाचारण करून 10 चक्का ट्रकने सदर वाळू जेसीबीने भरून तहसील कार्यालयामध्ये नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. या ट्रकमध्ये एकावेळी सहा ब्रास वाळूची लोडिंग ची व्यवस्था होती.
75 ब्रास जप्त केलेली वाळू तहसील कार्यालयात नेता नेता फक्त दोनच ट्रिप म्हणजे फक्त 12 ब्रास वाळू पोहोचली तर उर्वरित वाळू म्हणजे तब्बल 63 ब्रास ही चोरीला गेली आता या चोरीला गेलेल्या वाळूला जबाबदार कोण हा सवाल उपस्थित होत आहे.
सौंदड येथील तलाठी मुस्ताक कुरेशी यांना विचारणा केली असता पंचनामा केलेली सर्व वाळू म्हणजे 75 ब्रास वाळू ही तहसील कार्यालयामध्ये पोहोचवण्यात आली असं त्यांनी सांगितलं, मात्र प्रत्यक्षात तहसील कार्यालयामध्ये दोनच ट्रक वाळू पोहोचल्याचे चित्र आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी
सडक अर्जुनी चे तहसीलदार अक्षय पोयाम व अर्जुनी मोरगाव उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांना विचारणा केली असता त्यांनी देखील तलाठी यांच्या मार्गदर्शनात वाळू पोहोचल्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात तहसील कार्यालयामध्ये दोनच ट्रक वाळू पोहोचली, वाळूचे ताजे ढीग त्याचे उत्तम उदाहरण देत आहेत. त्यामुळे 63 ब्रास रस्त्यामध्ये गहाळ झालेली वाळू ही कुणी खाल्ली असा सवाल उपस्थित होत आहे. पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून चोरी झालेल्या वाळूवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला माहिती देते मात्र जप्त केलेली वाळू महसूल विभागच खात आहे. असे या झालेल्या प्रकरनावरून लक्षात येत आहे.
5400 रुपये ब्रास रेतीचा शासकीय रेट आहे. चोरी झालेली 63 ब्रास वाळूची एकूण किंमत 3 लाख 40 हजार 200 रुपये आहे. आता ही वसुली महसूल विभाग कोणाकडून करणार हे पाहण्यासारखे असेल. ज्या ठिकाणावरून 75 ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. त्यात जागेवर पुन्हा नव्याने वाळूचे ढीग तयार करण्यात आले आहेत. याचाच अर्थ असा की तालुक्यातील महसूल विभागाला वाळू माफिया जुमानत नाही. कुंपणच शेत खात असल्याचे उत्तम उदाहरण सडक अर्जुनी तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे. सदर प्रकरणाचा पाठपुरावा महाराष्ट्र केसरी न्यूज शेवटपर्यंत करणार हे विशेष. झालेल्या कारवाईमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील रेतीमाफीया चिडले आहेत. भेटेल तिथे याला चोपून काढू अशी धमकी वजा चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे.