गोंदिया, दी. 12 डिसेंबर : ऑक्टोबर 2023 ते 26 नोव्हेंबर 2023 या दरम्यान फिर्यादी धनराज पुंडलीक सयाम वय 30 वर्षे राहणार – खाडीपार/ पांढरी यांच्या ओळखीचे आरोपी नामे 1) सिध्दांत चव्हाण वय 30 वर्षे राहणार खाडीपार, 2) प्रविण पाटील वय 27 वर्षे राहणार देवरी, 3) कैलाश भोयर वय 35 राहणार- चोपा व त्यांचे रायपुर येथील राहणारे ईतर साथीदार 4) निखील कुमार कोसले, वय 25 वर्षे, 5) विक्की सिंग कोसले, 6) निलेष सुन्हारे या सहा आरोपीणी फिर्यादीस क्रेडिट कार्डवर लोन मिळवुन देतो असे सांगुन फिर्यादी यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करुन फिर्यादीच्या नावे 7 लाख रुपयांचे क्रेडिट कार्डवर लोन मंजुर केले.
तर फिर्यादीचे क्रेडिट कार्ड व मोबाईल फोन चा वापर करून त्यांच्या अकांउटवर फक्त 2 लाख 37 हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. तर उर्वरीत 4 लाख 63 हजार रुपये फिर्यादी यांच्या संमती शिवाय इतर ठिकाणी वर्ग करुन फिर्यादीची 4 लाख 63 हजार रुपये रक्कमेची व फिर्यादी प्रमाणेच इतर लोंकाचीही लोन मिळवुन देण्याच्या बहान्याने आरोपीनी आपणात संगणमत करुन फसवणुक केली. फिर्यादीच्या तक्रारी वरुन पो. स्टे.डूग्गीपर येथे गुन्हा र. क्रं. 436/ 2023 कलम 406,420, 467, 468, 471, 120 (ब) भारतीय दंड विधान संहिता अन्वये दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता व क्रेडिट कार्ड च्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूक पाहता सदर गुन्ह्यातील अरोपितांचा शोध घेवून त्यांना तात्काळ जेरबंद करण्याचे निर्देश पो. नि. स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेल यांना दिले.
गोपनीय माहिती व तांत्रीक माहितीच्या आधारे नमूद गुन्ह्यातील आरोपी यांना नागपूरवरुन ताब्यात घेवुन जेरबंद करण्यात आले आहे. आरोपी यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीतांनी क्रेडिट कार्ड द्वारे लोन मिळवून देण्याच्या नावावर बऱ्याच लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केली असल्याचे सांगितले आहे. नमूद गुन्ह्याचा अधिकचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, गोंदिया पथक करीत आहे अशी माहिती 8 डिसेंबर रोजी पोलिसांनी दिली.
