गोंदिया, दी. 23 नोव्हेंबर : ऑक्टोंबर 2003 चा शासन निर्णय असूनही अद्यापही कार्यवाही न होणे हा आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गोंदिया मध्ये आलेल्या शिक्षक बंधू भगिनींवर अन्याय आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करून संबंधित शिक्षकांना एक आगावू वेतन वाढ देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष किशोर बावनकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.
ते पुढे म्हणाले महाराष्ट्र शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलांच्या बाबतीत विविध प्रकारची धोरणे अवलंबलेली आहेत. त्यातच स्वतःच्या घरादारापासून व परिवारापासून दूर राहून विद्यार्थ्यांना ज्ञान देणाऱ्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने स्वतःच्या जिल्ह्यात बदली करून येण्याची संधी शासनाने दिलेली आहे. त्यातच तीन ऑक्टोंबर 2003 च्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास संबंधीत जिल्हा परिषदेत एक वेतन वाढ देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.
यानुसार आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गोंदिया येथे 3 आक्टोंबर 2003 नंतर जिल्हा परिषद आस्थापनेत रुजू झालेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एक आगावू वेतन वाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश असूनही ऑक्टोबर 2003 पासून कोणत्याही प्रकारची कार्यवाही जिल्हा परिषद गोंदियाने अजून पर्यंत केली नाही. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
त्यामुळे शासन निर्णयानुसार तात्काळ कार्यवाही करून संबंधित लाभ देय असलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना एक आगावू वेतनवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाने उचलून धरली आहे.
शासन निर्णयांचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ काढून विविध प्रकरणे प्रलंबित ठेवण्याचा इतिहास जिल्हा परिषद शिक्षण विभाग नक्की मोडून काढेल, अशी शास्वती आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषद गोंदिया येथे रुजू झालेल्या शिक्षकांना आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड वेतन श्रेणी प्रकरणे, संगणक वसुली, सरसकट एकस्तर, एकस्तर नुसार थकबाकी देणे, प्रोत्साहन भत्ता व अतिरिक्त घरभाडेची थकबाकी अदा करणे असे विविध प्रकरणे प्रलंबित आहेत तरीही आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना नक्कीच लवकर न्याय मिळेल अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली आहे.