कुठल्याही अटी शर्ती शिवाय सुरु करा धान खरेदी


  • प्रफुल्ल पटेल यांची फेडरेशनच्या महाव्यवस्थापकांशी चर्चा… 

गोंदिया, दि. 10 नोव्हेंबर : शासनाने शासकीय धान खरेदी संस्थाना धान खरेदी करण्यासाठी कुठल्याही अटी शर्ती न लावता जुन्याच निकषानुसार त्वरित धान खरेदी सुरु करावी, दिवाळीपुर्वी धान खरेदीला सुरुवात होणे अपेक्षित असताना अद्यापही धान खरेदी सुरु झालेली नाही. यावर खा. प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.१०) तीव्र नाराजी व्यक्त करीत मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक डी. एस. धपाटे यांना त्वरित धान खरेदी सुरु करण्यास सांगितले.

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीसाठी शासनाने यावर्षी नवीन निकष लावले होते. त्यामुळे धान खरेदी संस्थानी धान खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान याप्रकरणी खा. प्रफुल्ल पटेल यांनी लक्ष घालून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर १ नोव्हेंबरला या विषयावर मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.

या बैठकीत जुन्याच निकषानुसार धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधिचा जीआर देखील काढण्यात आला. पण गुरुवारी (दि.९) शासनाने धान खरेदी केंद्र सुरु करण्याचे आदेश काढले. पण त्यात धान खरेदी संस्थाना पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर शपथपत्र तसेच केंद्रावर विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची जातीचा उल्लेख व संस्थांना काही अटी शर्थी लागू केल्या आहे. त्यामुळे धान खरेदी संस्थांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान ही बाब माजी आ. राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा खा. प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी (दि.१०) सकाळी मार्केटिंग फेडरेशनचे महासंचालक डी.एस. धपाटे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. तसेच धान खरेदी सुरु करण्याच आदेशातील संपूर्ण अटी शर्थी रद्द करुन जुन्याच निकषानुसार धान खरेदी त्वरित सुरु करण्यास सांगितले. यावर महाव्यवस्थापक धपाटे यांनी लावलेल्या  अटी शर्थी रद्द करुन खरेदीला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने कुठल्याही आडकाठी विना त्वरित शासकीय धान खरेदीला सुरुवात करावी. धान खरेदी संस्था आणि शेतकऱ्यांना कुठलीही अडचण होणार नाही याची सुध्दा काळजी घ्यावी.
– प्रफुल्ल पटेल,खासदार


 

Leave a Comment

और पढ़ें