गोंदिया, दि. 04 नोव्हेंबर : बिरसी विमानतळ येथे आज, 4 नोव्हेंबर रोजी विमानतळ सल्लागार समितीची बैठक खासदार सुनील मेंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात संपन्न झाली. विमानतळ आणि त्या अनुषंगाने असलेल्या विविध अडचणी आणि समस्यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.
1 डिसेंबरपासून इंडिगो एअरलाइन्सच्या माध्यमातून गोंदिया- हैदराबाद ही प्रवासी वाहतूक विमान सेवा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. या नवीन उड्डाणाबद्दल असलेल्या नियोजनाची माहिती घेत खासदारांनी समाधान व्यक्त केले. विमानतळासाठी जमीन अधिग्रहित केल्याने निर्वासित झालेल्या व अजूनही भूखंडाचे विक्रीपत्र हाती न पडलेला 106 कुटुंबांचा प्रश्न चर्चेत आला. या भूखंड धारकांना तत्काळ विक्रीपत्र करून देण्यात यावे आणि त्या जागेत सर्व सुविधा देत विकास केला जावा, असे निर्देश खासदारांनी दिले.
अन्य जागेच्या संदर्भात असलेल्या काही प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना देण्यात आल्या. विमानतळाच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या जुन्या कामगारांना नवीन कंत्राटदाराने कामावर घेतले नाही. त्या जुन्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे, असे निर्देश दिले. विमानतळ प्रशासनातील एपीडी हे व्यवस्थित काम करीत नसल्याने त्यांच्याबद्दल अविश्वास व्यक्त केला.
सोबतच काम करत नसतील तर याची दखल घेऊन तत्काळ त्यांचे स्थानांतरण करण्यात यावे असे निर्देशही यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी दिले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार कुथे, विजयजीत वालिया, नंदू बिसेन, गजेंद्र फुंडे, अधिकारी शफीक शाह, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, कार्यकारी अभियंता विभाग लभाने, सरपंच संतोष सोनवणे, उपसरपंच उमेश पांडेले, रवी तावाडे आदी उपस्थित होते.