- गवराळामधील सहकारी संस्थेतील प्रकार
- ११ संचालकांविरोधात गुन्हा
भंडारा, दि. 13 ऑक्टोंबर : शासनाच्या किमान समर्थन मूल्य योजनेअंतर्गत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविणाऱ्या संस्थेच्या संचालकांनी मागील वर्षीच्या खरीप व रब्बी हंगामातील खरेदीत घोटाळा करून शासनाची ४ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांच्या तक्रारीवरून लाखांदूर तालुक्यातील ग्राम गवराळा येथील राष्ट्रसंत सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेच्या ११ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरेदी केलेल्या धानाअंतर्गत पणन विभागाने शेतकऱ्यांच्या विविध बँक खात्यात ऑनलाइन धान चुकारे अदा केले आहेत. मात्र, पणन विभागाच्या निर्देशानुसार या केंद्रातून राइस मिलर्सला खरेदी केलेल्या धानाची उचल करताना केवळ ४ हजार ६४८.७० क्विंटल धानाची उचल झाल्याची खोटी माहिती दिली. उर्वरित १४ हजार ८०२.१० क्विटल धानाचा संगनमताने घोटाळा करून ४ कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यामुळे जिल्हा पणन अधिकारी यांनी लाखांदूर पोलीसात तक्रार केली असून लाखांदूर पोलिसांनी ११ संचालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.