मुंबई वृत्तसेवा, दी. 24 सप्टेंबर : शिवसेना आमदार अपात्रता याचिकेच्या सुनावणी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांतील 54 शिवसेना आमदारांना नव्यानं नोटीस बजावून सोमवारी दुपारी 3 वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावलं आहे. विधानसभेपूर्वीच्या सर्व अपात्रतेच्या याचिका एकत्र करून ही नोटीस जारी करण्यात आली आहे. लोकमत 18 ने आज दिलेल्या वृत्त नुसार गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती.
एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
त्यानंतर ठाकरे गटाकडून शिंदेंना पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तर दुसरीकडे निवडणूक आयोगानं शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांकडून देखील याचिका दाखल करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर सुनावणी करताना हे प्रकरण आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आता याच प्रकरणात महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांतील 54 शिवसेना आमदारांना नव्यानं नोटीस बजावून सोमवारी दुपारी 3 वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावलं आहे.