आरोग्य केंद्रासंदर्भात उपमुख्यमंत्र्याशी चर्चा, समस्या लवकरच मार्गी लागणार : आ. मनोहर चंद्रिकापुरे


सडक अर्जुनी, दि. 14 सप्टेंबर : विधानसभा क्षेत्रातील आरोग्य समस्या संदर्भात आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी आज 14 सप्टेंबर रोजी चर्चा केली. यावेळी मंत्रालयातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वास आ. चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केला.

मतदारसंघातील अर्जुनी मोरगाव व सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे. वैद्यकीय अधिकारी व स्थायी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. दोन्ही रुग्णालयात ३० खाटांवरून १०० खाटा करून श्रेणीवर्धन करण्याचा १९ नोव्हेंबर २०१८ रोजी आयुक्तालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

प्रस्तावातील त्रुट्याची पूर्तता करण्याविषयी कळविण्यात आले मात्र अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. याकडे आ चंद्रिकापुरे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधले. इळदा व चिखली येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्षे लोटली. अद्याप या आरोग्य केंद्रासाठी कर्मचारी नियुक्तीचा प्रश्न सुटला नाही.

इमारतींचे लोकार्पण होऊ शकले नाही. इळदा येथील नवनिर्मित इमारतीतील विद्युतीकरणाची लोकार्पणापूर्वीच तुटफुट झाली आहे. नवीन विद्युतीकरणाचा प्रश्न कायम आहे. ही दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासंदर्भात आ. चंद्रिकापुरे यांनी ना. पवार यांचेशी चर्चा केली. आरोग्य समस्या लवकरच मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


 

Leave a Comment

और पढ़ें