गोंदिया, दि. 21 : जिल्हा बाल संरक्षण कक्ष गोंदिया यांच्या वतीने आयोजित जिल्हा बाल संरक्षण समिती गोंदिया आढावा सभेमध्ये जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना गोंदिया जिल्हा बालविवाह मुक्त करण्याबाबतची शपथ दिली.
जिल्हाधिकारी श्री. गोतमारे पुढे बोलताना म्हणाले की, बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. बाल हक्काचे उल्लंघन आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 अंतर्गत 18 वर्षाखालील मुलीचे व 21 वर्षाखालील मुलाचे लग्न करणे हा कायदेशीर गुन्हा आहे.
बालविवाह करणाऱ्या किंवा त्यात कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या किंवा सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते. त्याचप्रमाणे भविष्यात ज्या ठिकाणी सामुहिक विवाह सोहळा पार पडेल त्यांची सर्व माहिती आधीच घ्यायला हवी असे निर्देश दिले व एसेस टू जस्टीस अंतर्गत चालणाऱ्या बालविवाह मुक्त भारत अभियानाला शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचा आढावा मांडला, यामध्ये इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी ( बालविवाह मुक्त भारत अभियान ), दामिनी पथक पोलीस विभाग, चाईल्डलाईन यांच्या सहकार्याने जिल्ह्यात तीन बालविवाह थांबविल्याची माहिती व एका बालमजुराची सुटका केल्याची माहिती दिली.
यानंतर बालकल्याण समितीचे अध्यक्ष देवका खोब्रागडे यांनीही आढावा सादर केला. इंडियन सोशल वेलफेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर यांनी सांगितले की, नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन दिल्ली व इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटी गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने गोंदिया जिल्ह्यात बालविवाह मुक्त भारत अभियान सुरू आहे.
या माध्यमातून सर्व गांव पातळीवर शहरी भागात शाळा असे सर्व ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आणि गावागावात, घरोघरी जाऊन व्यक्तिगत, कुटुंबातील लोकांना व सामुहिक स्तरावर उपस्थितांना बालविवाह न करण्याबाबतची तसेच बाल तस्करी, बाल लैंगिक शोषण आणि बालकामगार मुक्त जिल्हा याबद्दल प्रतिज्ञा देत आहेत.जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तुषार पौनीकर यांनी बालकांसाठी असलेल्या कायद्याची माहिती सांगितली. यावेळी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते बालविवाह मुक्त भारत अभियानाच्या पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
सभेला जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पवनीकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे, बालकल्याण समिती अध्यक्ष देवका खोब्रागडे, इंडियन सोशल वेल्फेअर सोसायटीचे संचालक अशोक बेलेकर, बाल न्याय मंडळ सदस्य वंदना दुबे, बालकल्याण समिती सदस्य सर्वश्री मनोज राहांगडाले, अलका बोकडे, जयश्री कापगते, वर्षा हलमारे, बाल न्याय मंडळ सदस्य मेघना गभणे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक कुणाल गुंडच्यावर, आयएसडब्ल्यूएस जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर पटले, चाईल्डलाईन सेंटरचे कोऑर्डिनेटर विशाल मेश्राम तसेच शिक्षण विभाग, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, समाज कल्याण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.