जिल्ह्यात विकासाच्या नव्या आशा आकांक्षाची पायाभरणी – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे


  •  76 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा… 

गोंदिया, दि. 16 ऑगस्ट : सर्वसामान्य जनता, शेतकरी व समाजाच्या सर्व घटकांच्या विकासासाठी राज्य शासन कार्य करीत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग आता नागपूर पासून गोंदिया पर्यंत वाढविण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत.



महिलांना एसटी प्रवासात सरसकट 50 टक्के सुट. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत राज्यातर्फे प्रती शेतकरी 6 हजार रुपये. शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विमा. राज्यातील सर्व नागरिकांना १५ ऑगस्टपासून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.



अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणण्याचा तसेच प्रलंबीत प्रकल्प पूर्ण करण्याचे लोककल्याणकारी निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. राज्यात व आपल्या जिल्ह्यात प्रगती आणि विकासाच्या नव्या आशा व आकांक्षाची पायाभरणी या निमित्ताने झाली असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले.



पोलीस मुख्यालय मैदान कारंजा, गोंदिया येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सन 2022-23 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील ग्रामीण भागात विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे राज्यात प्रथम येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याने पटकविला आहे.



जिल्ह्यातील 8 तालुक्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात आले. असून सदर दवाखान्यात नागरिकांना मोफत संदर्भसेवा पुरविण्यात येत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 37 हजार 466 शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.



एक रुपयात पीक विमा देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणारी ‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यशस्वीपणे राबविली आहे. या योजनेत जिल्ह्यातील 27 हजार 874 शेतकरी पात्र ठरले असून त्यापैकी 22 हजार 953 शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 73 कोटी 45 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.



गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिध्द आहे. शासकीय आधारभुत किंमत धान खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2022-23 मध्ये 116 धान खरेदी केंद्रामार्फत 1 लाख 12 हजार 946 शेतकऱ्यांकडून 39 लाख 98 हजार 611 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्याची आधारभुत किंमत 815 कोटी 71 लाख रुपये आहे. शासनाकडून 815 कोटी 71 लाख रुपये प्राप्त झाले असून 815 कोटी 3 लाख रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले.

आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प देवरी अंतर्गत एकलव्य आश्रम शाळेतील 18 विद्यार्थी जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यावर्षी 32 विद्यार्थी सीईटी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 30 विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला आहे, ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा क्रांती योजना व राष्ट्रीय कृषि विकास कार्यक्रम या तिन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्यात येतो.

सन 2022-23 मध्ये जिल्ह्यात 100 टक्के अनुदानावर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांच्या 241 सिंचन विहिरी पुर्ण करण्यात आल्या असून शेतकरी आपले उत्पादन वाढविण्याकरीता या योजनेचा लाभ घेत असल्याचे ते म्हणाले. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 2022-23 मध्ये 127 कि. मी. लांबीचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले असून त्यावर 61 कोटी 48 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2022-23 मध्ये 87.65 कि.मी.ची 45 कामे पूर्ण करण्यात आलेली असून त्यावर 73 कोटी 88 लाख रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे. सामाजिक बांधिलकी पूर्ण करण्याच्या उद्देशाने पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत निर्धुर चुलीचे वाटप, शालेय साहित्य वाटप, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावे, महिला बाल सुरक्षितता व समुपदेशन, जनजागृती मार्गदर्शन शिबीर, सायकल वाटप, कृषि मार्गदर्शन शिबीरे व धान्यबीज वाटप, कृषीपंप वाटप, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, नक्षल विरोधी जनजागृती मार्गदर्शन शिबीर, वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले, प्रमाणपत्र तयार करुन देणे इत्यादी उपक्रम घेण्यात आले आहेत.

या उपक्रमाद्वारे पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद दृढ होत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा पर्यटन विकास समिती तसेच नॅशनल ॲडव्हेंचर फाऊंडेशन नागपूर व गोंदिया वन विभाग अंतर्गत नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समिती नवाटोला यांचे संयुक्त विद्यमाने हाजराफॉल या नैसर्गीक पर्यटन स्थळाचे विकासाचे कार्य करुन 26 युवक व 22 युवती असे एकूण 48 स्थानिक होतकरु व प्रशिक्षीत युवक-युवतींना रोजगार प्राप्त झालेला आहे.

सन 2022-23 मध्ये 23 हजार 894 पर्यटकांनी भेट दिली असून त्यांचेकडून 24 लाख 63 हजार 260 रुपये महसूल प्राप्त झालेला आहे. यासोबतच जिल्ह्यात जिल्हा परिषद कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, वन विभाग, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, समाज कल्याण, आदिवासी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, कौशल्य विकास विभाग व इतर सर्व विभागामार्फत सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय व लोककल्याणकारी योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यात येत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा आज सांगता समारोप असून केंद्र शासनाच्या ‘मेरी माटी-मेरा देश’ अभियानास जिल्ह्यातील नागरिकांनी लोकचळवळीचे स्वरुप देवून हे अभियान यशस्वी करावे, असे ते म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सर्वसामान्य नागरिकांचा विकास व जिल्ह्याची प्रगती हेच प्रशासनाचे ध्येय आहे. सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द होऊन जिल्हा अग्रेसर ठेवूया असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. पुरुष व महिला पोलीस दल, पुरुष व महिला होमगार्ड पथक, माजी सैनिक दल, पोलीस बँड पथक, पोलीस श्वान पथक, अग्नीशमन दल यांनी परेड संचलन केले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (रोहयो) चंद्रकांत खंडाईत, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांचेसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती मंजुश्री देशपांडे यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.


 

Leave a Comment

और पढ़ें