गोंदिया, दि. ०४ ऑगस्ट २०२३ : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत १२ हजार रुपयाची मागणी करणाऱ्या एका अधिकाऱ्या सह एका खाजगी इसमाला ताब्यात घेतले आहे. आरोपी लोकसेवक जयंतप्रकाश ईश्वरदास करवडे वय ३९ वर्ष पद – पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती गोंदिया जिल्हा गोंदिया रा. तिरोडा जि. गोंदिया (वर्ग १) असे आहे.
तर खाजगी ईसम महेंद्र हगरू घरडे वय ५० वर्ष धंदा खाजगी नोकरी रा. मु. पो. चुटीया. ता. गोंदिया असे आहे. तक्रारदार पुरूष वय ४२ वर्ष, रा. जि. गोंदिया. यांनी नाविन्यपुर्ण योजना अंतर्गत १००० मांसल कुक्कुट पक्षीगट योजने अंतर्गत कुक्कुटपालना करीता शेड ची उभारणी करून कोंबड्यांची पिल्ले खरेदी करून व्यवसाय सुरू केला आहे.
सदर योजने अंतर्गत शासनाकडून मिळणारा अनुदानाचा पहीला हप्ता रक्कम रु ६८५०० तक्रार दारास मिळाला असून अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे १ लाख रुपये रकमेचा धनादेश काढून देण्याचे प्रकरण मार्गी लावण्याकरीता आरोपी लोकसेवक जयंतप्रकाश ईश्वरदास करवडे यांनी तक्रारदाराकडे १२ हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती ११ हजार रुपये लाच मागणी करून १० हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दाखवुन व उर्वरित १ हजार रुपये लाच धनादेश मिळाल्यानंतर देण्याची केली.
आज ०३ ऑगस्ट रोजी लाचेची रक्कम १० हजार रुपये ही आरोपी खाजगी ईसम महेंद्र हगरू घरडे याच्या मार्फत स्विकारली असुन लाचेच्या रकमेसह आरोपी खाजगी ईसम महेंद्र हगरू घरडे व तदनंतर आरोपी जयंतप्रकाश ईश्वरदास करवडे पशुधन विकास अधिकारी या दोघांना ताब्यात घेऊन पो. स्टे. गोंदिया शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पो. नि. उमाकांत उगले, पो. नि. अतुल तवाडे, स. फौ. विजय खोब्रागडे, पो. हवा. संजयकुमार बाहेर, पो. हवा. मंगेश काहालकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, नापोशि प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली आहे.
