- 30 कोटी 90 लाखांच्या सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाच्या कामांना मंजूरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा 6 ऑगस्ट रोजी संपन्न होणार
गोंदिया, दिनांक : ०२ : सभागृहात मागणी करतानाच प्रत्यक्ष केंद्रीय रेल्वेमंत्री आणि रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेटून सातत्याने पाठपुरावा करीत गोंदिया रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्नरत असलेल्या खासदार सुनील मेंढे यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर केंद्र शासनाने 31 कोटी रुपये किमतीच्या कामांना मंजुरी प्रदान केली आहे. यामुळे आता गोंदिया रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण होऊन त्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
1878 साली निर्माण झालेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाचे उद्घाटन 1880 मध्ये झाले होते. 1888 साली स्टेशन सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात आले. हावडा नागपूर मुंबई या मुख्य मार्गावर असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाचे सौंदर्यकरण आणि विस्तारीकरण व्हावे या दृष्टीने खासदार म्हणून जबाबदारी आल्या पासून खा. सुनील मेंढे यांनी या दृष्टीने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले होते. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 5 ऑगस्ट 2022, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी 8 ऑगस्ट 2022 ला पत्र पाठवून या स्थानकाचे जागतिक दर्जाच्या रेल्वे स्थानकात रूपांतर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी मागणी केली होती.
दरम्यान 2023-2024 चा अर्थ संकल्पात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील गोंदिया, तुमसर आणि भंडारा रेल्वे स्थानकांच्या समावेश केला गेला होता. सातत्याने खासदारांच्या सुरू असलेल्या पाठपुराव्याला आलेले हे पहिले यश होते. यात गोंदिया रेल्वे स्थानकाचा समावेश होता. त्यानंतर मंजूर झालेल्या गोंदिया रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरण आणि सौंदर्यकरणाच्या कामाला विशिष्ट असा कृती आराखडा तयार करून सुरुवात करावी अशा आशयाची मागणी ही खासदार सुनील मेंढे यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती.
या पत्राची दखल घेत केंद्रीय मंत्र्यांनी विस्तृत माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिल्याची पोच खासदारांना दिली होती.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यकरणांनी विस्तारीकरणासाठी 31 कोटी रुपयाच्या कामाला केंद्र शासनाने आता मंजुरी दिली आहे. खासदारांच्या सततच्या पाठपुराव्याने 8 कोटी एवढा असलेला निधी वाढून तीस कोटीच्या घरात गेला, हे नक्कीच अभिमानास्पद आहे.
मंजूर झालेल्या निधीत रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार, बगीच्या, रेल्वे स्थानकाचे सौंदर्यकरण, स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याची रुंदीकरण, पादचारी मार्ग, शौचालय निर्मिती, अत्याधुनिक वातानुकूलित प्रतीक्षालय, फलाटाचे विस्तारीकरण, भित्तीचित्रे, वाहनतळ, रंगरंगोटी, लिफ्ट, दोन स्वयंचालित (Excavator) पायऱ्या आणि सीसीटीव्ही कॅमेरे यांचा समावेश राहणार आहे. गोंदिया रेल्वे स्थानकाचे रुपडे आता या कामांमुळे पालटणार असून प्रवाशांना अत्याधुनिक सोयी सुविधांचा लाभ मिळणार आहे. गोंदिया येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू केल्यानंतर गोंदिया वासीयांसाठी ही दुसरी सर्वात मोठी उपलब्ध असून खासदार सुनील मेंढे यांच्या सततच्या पाठ पुराव्याने आणि चिकाटीमुळे हे शक्य झाले आहे.
या कामांना मंजुरी दिल्याबद्दल खासदार सुनील मेंढे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे मनापासून आभार मानले आहेत. या कामाचे भूमिपूजन सोहळा 6 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सकाळी 9:30 वाजता होणार आहे. या निमिताने गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात आयोजित गोंदिया जिल्हा वासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खा. सुनील मेंढे यांनी केले आहे.